ओझर टाऊनशिप : देह देवाचे मंदिर असून, ते अंतरबाह्य निर्मळ ठेवा. आपल्या देहात अनेक देवतांचा वास आहे. प्रत्येक इंद्रियात देवता असून, देहाचे पावित्र्य पाळावे, असे बोधवचन श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी शनिवारी केले.येथील जनशांतिधाम येथे पौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाविकांशी संवाद ते बोलत होते. पौर्णिमेनिमित्त नित्यनियम विधी, ध्यान, प्राणायाम, सत्संग, प्रवचन आदी कार्यक्रम संपन्न झाले. स्वामीजी पुढे म्हणाले की, आपल्या शरीरात अनेक देवतांचे स्थान आहे. डोळ्यात सूर्य देव, नाभीत नारायण, हृदयात भगवान शिव, हातात इंद्र, पायात जयंत देव अशा प्रकारे प्रत्येक इंद्रियात कोणत्याना कोणत्या भगवंताचा वास आहे. मानवी देह देवाचे मंदिर आहे. ते अंतरबाह्य निर्मळ ठेवावे. स्नान करताना आपण भगवंताला स्नान घालत असल्याची भावना ठेवा. जेवताना नामस्मरण करत जेवण करा. पती-पत्नीने एकमेकांचा आदर राखा. एकनिष्ठ राहा. पुरुषांनी आपल्या कर्तव्याचे पालन करावे. एकमेकांनी पावित्र्य जपले पाहिजे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. रविवारपासून (दि. १०) सुरू होणाºया जगत्माउली म्हाळसा माता पुण्यतिथीसोहळ्या निमित्त आयोजित महिला संस्कार शिबिरात सहभागी होऊन इतरांनादेखील सहभागी होण्यास सांगावे, असे आवाहन स्वामीजींनी केले.
देह देवाचे मंदिर; पावित्र्य पाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:05 AM