संदीप झिरवाळ
नाशिक : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजा नव्हे तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे प्रत्येक मराठी माणूस त्यांना ईश्वरासम पूजतो. त्यामुळे नाशिक मध्ये २१ वर्षांपूर्वी दिंडोरी रोड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधण्यात आले आहे. दररोज शेकडो नागरिक येथे दर्शनाला जातात उत्तर महाराष्ट्राचं हे एकमेव छत्रपतींचे मंदिर आहे.
आम्ही राजेंना देवरूपात बघतो म्हणूनच नित्य नियमाने त्यांना भजतो आणि पूजतो, अशी भावना दिंडोरी रोडवर आरटीओ कॉर्नरनजीक स्थापनकेलेल्या ‘शिवराम’ मंदिरात दैनंदिन दर्शनासाठी जाणारे शिवप्रेमी आदराने व्यक्त करतात. २१ वर्षांपूर्वी १९ जानेवारी २००२ रोजी प. पू. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या संकल्पनेतून परिसरात शिवराम मंदिराची स्थापना करण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील पहिले मंदिर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात दरवर्षी शिवजयंतीला दुग्धाभिषेक, होम हवन करून छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन केले जाते. मंदिरात पंचधातूपासून तयार केलेली शिवरायांची २५० ते ३०० किलो वजनाची मूर्ती असून, ती औरंगाबाद येथून तयार करून त्यावेळी विधिवत संस्कार करून प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. शिव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व राम म्हणजे रामचंद्र पारनेरकर म्हणून मंदिराचे ‘शिवराम’ नामकरण केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीशेजारी रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर यांची संगमरवरी मूर्ती आहे, याशिवाय मंदिरात गुरुदेव दत्त, गणपती, महादेव, हनुमान, तुळजाभवानी यासह संत तुकाराम आणि समर्थ रामदास महाराज यांच्यादेखील मूर्ती आहेत.
उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत पहिले मंदिर म्हणून या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराम मंदिराची संपूर्ण जिल्ह्यात ओळख आहे. छत्रपती शिवरायांनादेखील देवाचा अवतार मानले जात असल्याने मंदिरात दैनंदिन सकाळीवैदिक पद्धतीने आरती, पूजन केले जाते. शिवजयंतीच्या दिवशी मुख्य मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत अभिषेक करून दुग्धाभिषेक केला जातो. शिवाजी महाराजांच्या मंदिरात राजेश कुलकर्णी दैनंदिन पूजा विधीचे काम बघतात. या मंदिरात शिवप्रेमी दरवर्षी शिवजयंतीच्या दिवशी हजेरी लावून महाराजांच्या मूर्तीचे पूजन करतात, तर वर्षभरात अनेक शिवप्रेमी मंदिर बघण्यासाठी येतात. मंदिराच्या वर्धापन दिन निमित्ताने दरवर्षी मंदिराची रंगरंगोटी, तसेच डागडुजीचे कामदेखील केले जाते. याशिवाय वर्धापनाच्या दिवशी विविध कार्यक्रमांचेदेखील आयोजन केले जाते.