देवळा : वासोळ येथील एका निर्दयी मातेने आपल्या एक दिवसाच्या अर्भकाला रस्त्यावर टाकून देण्याची घटना घडल्यानंतर आरोग्य सेवेतील एका माउलीने ममत्वाचे दर्शन घडवत त्या कोवळ्या जीवाला जीवदान दिले. महिलेमधील एक निष्ठुर तर दुसरी मायाळू अशी दोन रूपे तालुकावासीयांना दिसून आली. दरम्यान, संबंधित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पित्याचा शोध सुरू आहे.सोमवारी (दि. १४) पहाटे वासोळ येथील आदिवासी वस्तीत कुणा अज्ञाताने तासापूर्वी जन्माला आलेल्या एका स्त्री जातीच्या अर्भकाला रस्त्यावर टाकून दिल्याची घटना घडली होती. परिसरातील भटक्या कुत्र्यांनी सदर नवजात शिशूला जखमी केल्यानंतर त्याला उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय उपचार सुरू केले; परंतु उपचारांना समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे सर्व जण चिंतित झाले. त्या नवजात अर्भकाला वाचविण्यासाठी मायेची ऊब गरजेची होती. सदर बाब लक्षात येताच देवळा ग्रामीण रुग्णालयातील औषध निर्माण अधिकारी वैशाली कांबळे यांनी क्षणाचाही विलंब न करता मायेच्या ममतेने या अर्भकाची शुश्रूषा केली. गाईचे दूध उपलब्ध करून ते पाजले, यामुळे उपचारांना प्रतिसाद मिळू लागल्यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर पुढील उपचारासाठी मालेगाव येथे जाण्यासाठी क्षणाचाही विलंब न करता श्रीमती कांबळे स्वतः पुढे आल्या व रुग्णवाहिकेतून बाळाला मालेगावपर्यंत नेले. तेथेही दवाखान्यात दाखल करणे, औषध उपचार व इतर सर्व सोपस्कार पूर्ण होईपर्यंत बालिकेची देखभाल केली.
खरेतर अशावेळी थोडेफार अपवाद वगळता प्रत्येक जण जबाबदारी झटकून बाजूला होत असल्याचा अनुभव सर्वश्रुत आहे; परंतु कांबळे यांनी प्रीती खोटरे यांच्या मदतीने दाखविलेले माणुसकीचे दर्शन सर्वत्र कौतुकाचा विषय झाला आहे.