गंगापूर : महाशिवरात्रीनिमित्त गंगापूरच्या सोमेश्वर महादेव मंदिरात भाविकांची गर्दी उसळल्याचे चित्र पहावयास मिळाले. सोमेश्वर मंदिर संस्थानच्या वतीने गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांचा फौजफाटा उपस्थित होता.दरम्यान, भाविकांना दर्शनासाठी मंदिरातील गाभाऱ्यात फक्त एकेरी लाइन करून सोडण्यात येत होते. आगामी निवडणुकीच्या तोंडावर इच्छुक उमेदवार तसेच आजी, माजी लोकप्रतिनिधींनी सहकुटुंब महादेवाला साकडे घातले.सोमेश्वर महादेव मंदिरात भाविकांनी महादेवाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती. हर हर महादेव, बम बम भोलेच्या गजरात मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. पहाटे ५ वाजता सोमेश्वर संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब लांबे व माजी अध्यक्ष प्रमोद गोरे यांनी खासदार हेमंत गोडसे, शिवसेना गटनेते विलास शिंदे, अजय बोरस्ते, बबनराव घोलप, उद्धव निमसे, नगरसेवक संतोष गायकवाड, राधा बेंडकुळे, नयना गांगुर्डे आणि संस्थानचे विश्वस्त पदाधिकारी यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.परिसराला यात्रेचे स्वरूपरस्त्याच्या दोन्ही बाजूने दुकानदारांनी आपली दुकाने थाटल्याने परिसरात दुकानदारांचीही गर्दी जाणवत होती. मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मंदिर संस्थानच्या वतीने भाविकांसाठी मोफत साबूदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. यावेळी गंगापूर पोलिसांचा फौजफाटा गर्दीवर नियंत्रण व वाहतुकीला मार्ग मोकळा करून देण्याचे काम करीत होते. मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप येऊन सायंकाळी चारही बाजूने गर्दी वाढल्याने चालण्यासाठी भाविकांना जागा मिळत नव्हती.ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनातश्री सोमेश्वर मंदिरात महादेवाचे दर्शनासाठी शहर, जिल्हा, व राज्यभरातून भाविक आले होते. देशातील युद्धजन्य परिस्थिती पाहता गर्दीच्या ठिकाणी विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कुठल्याही प्रकारची जोखीम नको म्हणून मेटल डिटेक्टर दरवाजा बसविण्यात आला होता. भाविकांना वेळोवेळी सुरक्षेसंदर्भात सूचना केल्या जात होत्या. भाविकांची गर्दी वाढत चालल्याने सकाळपासूनच दर्शनासाठी एकेरी लाइन करण्यात आली होती. सायंकाळी भाविकांची मंदिर परिसरात दर्शनासाठी गर्दी वाढल्याने पोलिसांची धावपळ उडाली होती़
महाशिवरात्रीनिमित्त सोमेश्वर मंदिरात रीघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 1:37 AM