त्रिपुरी पौर्णिमा आणि कार्तिक महोत्सवाच्या सोहळ्यानिमित्त गुरुवारी शहरातील काळाराम मंदिरासह सर्व मंदिरे आणि गोदाकाठ दीपोत्सवाने झळाळून निघाला होता. हजारो नाशिककरांनी त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त भक्तिभावाने पारंपरिक पाेषाख परिधान करून गोदाकाठी दीप प्रज्वलित केले.
गाेदाघाटावर नागरिकांसह पुराेहित संघाने रामकुंड, गंगा-गाेदावरी मंदिर लखलखून टाकले हाेते. सायंकाळी नागरिकांच्या उपस्थितीत गंगा गोदावरीमातेची आरती करण्यात आली. या साेहळ्यासदेखील अनेक भाविक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. त्रिपुरासुर नामक राक्षसाचा भगवान शंकरांनी वध केल्यानंतर देवलोकात आनंंदोत्सव साजरा करण्यात आला. या आख्यायिकेला अनुसरून हा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा असेही म्हणतात. यानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध ठिकाणी दीपोत्सव व तुळशीच्या लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील काळाराम मंदिराचा परिसर दिव्यांनी झळाळून उठल्याने खूपच आकर्षक दिसत हाेता. तर रविवार कारंजावरील चांदीच्या गणपती मंदिरालादेखील विशेष रोषणाईने सजविण्यात आले होते. पौर्णिमेनिमित्त शिव मंदिरात त्रिपूर वाती लावण्याची परंपरा असून त्या परंपरेचेही पालन करण्यात आले. कार्तिकी एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. या पौर्णिमेनिमित्त मुरलीधर गल्लीत सिद्धेश्वर महादेव मंदिरात शंकराला अर्धनारी नटेश्वराचा मुखवटा लावून विविध फळांची फुलांची आरास करण्यात आली. त्याचप्रमाणे पणत्यांची रोषणाईदेखील करण्यात येणार आहे. तीळभांडेश्वर मंदिरातदेखील विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.