नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी घोषित करण्याचा आणि त्यानंतर एबी फॉर्म वाटपाचा फटका शिवसेनेला बसला असून, दहा उमेदवारांचे एबी फॉर्म निवडणूक अधिकाऱ्यांनी रद्द ठरविल्याने त्यांना अपक्ष लढण्याची वेळ आली आहे. तथापि, शिवसेनेने त्यांना आता पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतला असून, तशी माहिती पक्षाचे सचिव अनिल देसाई यांनी सोमवारी दिली. दरम्यान, उमेदवारी वाटपाचा आणि एबी फॉर्म देण्याच्या घोळाला त्यांनी तांत्रिक दोष संबोधून या प्रकारची चौकशी करण्याचे टाळले. महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने मुंबईहून मुखपत्रात यादी जाहीर केली जाते आणि त्यानंतर एबी फॉर्म दिले जातात, अशी पद्धत असताना यंदा शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी घोळात ठेवण्यात आली आणि अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच ३ फेबु्रवारीला यादी घोषित करण्यात आली. त्यानंतर एबी फॉर्मचे वाटप सुरू असताना अनेक घोळ झाले. काही ठिकाणी वेळेत अर्ज पोहोचले नाही, तर काही ठिकाणी झेरॉक्स फॉर्म देण्यात आले. सिडकोतील एका प्रभागात तर चार उमेदवार आणि प्रत्यक्षात शिवसेनेचे आठ एबी फॉर्म देण्यात आले. या घोळानंतर पंचवटीमधील प्रभाग चारमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी कोरे एबी फॉर्म दिले होते. छाननीत ते बाद करण्यात आले. त्यानंतर प्रभाग क्रमांक तीसमध्ये मूळ एबी फॉर्म न जोडता झेरॉक्स जोडण्यात आल्या होत्या. तर सिडकोत प्रभाग २९ मध्ये चार उमेदवार असताना सात उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. त्यावेळी प्रथम उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निकषावर दीपक बडगुजर, भूषण देवरे, रत्नमाला राणे, सुमन सोनवणे हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विद्यमान नगरसेवक अॅड. अरविंद शेळके, सतीश खैरनार, माधुरी खैरनार यांचे एबी फॉर्म बाद ठरविण्यात आले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर घोळाची चौकशी करण्यासाठी अनिल देसाई नाशिकमध्ये आले होते. त्यांनी उमेदवारीसाठी प्रंचड गर्दी असल्याने काही प्रमाणात एबी फॉर्म देण्यात घोळ झाल्याचे मान्य केले. तथापि, प्रभाग चार आणि तीसमध्ये एबी फॉर्म बाद झालेल्या शिवसेनेच्या उमेदवारांना आता अपक्ष निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यांना पक्ष पुरस्कृत करणार असल्याची माहिती देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. अर्थात, निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या अधिक असताना अशा प्रकारच्या त्रुटी राहिल्या गेल्याचे सांगताना त्यांनी चौकशी करण्याचा विषय टाळला. (प्रतिनिधी)हे आहेत पुरस्कृत उमेदवारप्रभाग चारमध्ये भगवान भोगे, सविता बडवे, प्रतिभा घोलप, वर्षा गिते, तर प्रभाग ३० मध्ये संजय चव्हाण, नीलेश चव्हाण, शकुंतला खोडे, रशिदा शेख यांच्या उमेदवारी अर्जासमवेतचे अर्ज बाद ठरल्याने त्यांना पुरस्कृत करण्यात आले आहे. प्रभाग २९ मध्ये शिवसेनेने डबल एबी फॉर्म दिल्याने घोळ निर्माण झाला होता. मात्र, त्यातही आता शिवसेनेने मनसेतून विद्यमान नगरसेवक अॅड. अरविंद शेळके आणि सतीश खैरनार यांना अधिकृत उमेदवार म्हणून देसाई यांनी घोषणा केली. या प्रभागात शिवसेनेचे एबी फॉर्म असलेले अन्य उमेदवार २९ मध्ये दीपक बडगुजर आणि भूषण देवरे हे माघार घेणार आहेत, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.
एबी फॉर्म बाद झालेले दहा उमेदवार आता शिवसेना पुरस्कृत
By admin | Published: February 07, 2017 12:05 AM