नाशिक : कोरोनासारख्या महामारीच्या विरोधात लढण्यासाठी दानशूर व्यक्ती मदतीसाठी पुढे येत असताना नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने दहा कोटी रुपयांची घसघशीत मदत जाहीर केली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू ई वायुनंदन यांनी आज ही माहिती दिली. विद्यापीठाच्या वतीने बुधवारी (दि.१५) वित्त समितीची बैठक व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे घेण्यात आली. त्यात कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दहा कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.गेल्या पंचवीस वर्षांपासून हे विद्यापीठ वंचितांना ज्ञानदान करीत आहे. विद्यापीठाचे कार्यक्षेत्र राज्यस्तरीय आहे. त्यामुळे राज्यभरात पसरलेल्या विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने हे योगदान देण्यात आले असल्याचे कुलगुरू वायुनंदन यांनी सांगितले. गेल्या ७ एप्रिल रोजी कुलपती तथा राज्यपालांनी सर्व विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंची विविध विषयांबाबत बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी तसेच उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत देण्याचे आवाहन केले होते. त्या आधारे दहा कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कुलगुरूंनी सांगितले.-------------------राज्यपाल महोदय आणि शिक्षणमंत्री यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुक्त विद्यापीठाने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दहा कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण महाराष्टÑ असून, सुमारे सात लाख इतकी विद्यार्थी संख्या आहे. विद्यापीठ प्रशासन आणि विद्यापीठातील विद्यार्थी यांच्या वतीने राज्य शासनाला ही मदत करण्यात येत आहे. राज्यावरील या कोरोना संकटाच्या काळात आपण मदत करू शकलो, याचे समाधान आहे.- ई. वायुनंदन, कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट मुक्त विद्यापीठ