चांदवड : उज्जैनहून देवदर्शन आटोपून परतणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरचे आडगाव टप्पा शिवारात अचानक टायर फुटल्याने ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. अपघातात दहा भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून, १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी पहाटे पावणेसहा वाजेच्या सुमारास सदर दुर्घटना घडली. मृतांमध्ये उल्हासनगर व कल्याण परिसरातील गुजराथी कुटुंबातील सात महिला, दोन पुरुष व एका लहान मुलाचा समावेश आहे.उल्हासनगरच्या राजीव नागदेव यांची साई ट्रॅव्हल्सची टेम्पो ट्रॅव्हलर (एमएच ०५ आरओ ३५७) या बसने सोमवारी चालक संतोष किसन पिठले (३८, रा. उल्हासनगर) हा २२ भाविकांना घेऊन देवदर्शनासाठी घेऊन गेला होता. त्यात उल्हासनगर, कल्याण व नाशिकच्या भाविकांचा समावेश होता. ओंकारेश्वर, महाकालेश्वर, उज्जैन येथील देवदर्शन आटोपून ती टेम्पो ट्रॅव्हलर बस उज्जैन येथून बुधवार दि. ६ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास परतीच्या प्रवासास निघाली होती. चांदवड तालुक्यातील आडगाव टप्पा येथे पहाटे पाच वाजुन चाळीस मिनिटांच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हलर बसचे टायर अचानक फुटले. बसचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने सदर बस रस्त्यात उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकवर (एम.एच.१५ सी.के.८४२२) जाऊन आदळली. अपघाताचा आवाज प्रचंड असल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. अपघातात दहा भाविकांचा जागीच मृत्यू झाला होता, तर १४ जण गंभीर जखमी झाले होते. यावेळी सोमा कंपनीचे गस्तीपथक, रुग्णवाहिका, सरकारी रु ग्णवाहिकेच्या साहाय्याने मृत व जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात आणले. जखमींवर डॉ. राजपुत, डॉ. गाडेकर, डॉ. श्रीमती केदार यांनी उपचार सुरू केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी चांदवड शहरातील खासगी डॉक्टरांना मदत कार्यासाठी बोलविले. त्यात डॉ. जीवन देशमुख, डॉ. संदीप देवरे, डॉ. कुंभार्डे, डॉ. सतीश गांगुर्डे व तळेगावरोही प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. खैरनार यांनी औषधोपचार केले. १४ जखमींपैकी नऊ जणांवर प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी नाशिक येथे पाठविण्यात आले. मृतांची ओळख पटविण्यासाठी बºयाच वेळ लागला. कारण मृतांचे नातलग कल्याण व उल्हासनगर येथून येण्यास उशीर लागला.घटनास्थळी तातडीने धाव घेत पोलिस निरीक्षक अनंत मोहिते उपनिरीक्षक कैलास चौधरी,रामचंद्र जगताप व पोलीस कर्मचारी बापु चव्हाण, पालवी, बिन्नर, मंगेश डोंगरे, दीपक मोरे, संसारे, देशमुख, हेमांडे यांनी मदत कार्य केले .