नाशिक : जिल्ह्यात केवळ ५६ टक्के इतकाच पाऊस झाल्याने ९२ पैकी ४४ मंडळांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असताना त्यात आणखी दहा मंडळाचे भर पडणार आहे. जिल्ह्यातील दुष्काळाचे सावट असलेल्या मंडळांची संख्या आता 54 झाली आहे.
पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील काही भागांची स्थिती नक्कीच गंभीर होऊ पाहत आहे. २१ दिवसांचा खंड असलेली जिल्ह्यातील ९२ पैकी ४४ मंडळांमध्ये दुष्काळाची स्थिती असून, त्यामध्ये येत्या दोन दिवसांत आणखी दहा मंडळांची भर पडणार आहे. असे एकूण ५४ मंडळांमध्ये दुष्काळाचे सावट असल्याने पीकविमा कंपन्यांनी पंचनामे करावेत, अशा सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्या.
जिल्ह्यात ऑगस्ट अखेरपर्यंत ६७२ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मागीलवर्षी आतापर्यंत ८७१ मिमी इतका पाऊस झाला होता तर आतापर्यंत ३८० मिमी पाऊस झालेला आहे. मागील वर्षापेक्षा ५६ टक्के इतकाच पाऊस झालेला आहे. आता परतीच्या पावसावरच भरवसा असून, मागील तीन वर्षांचा अनुभव लक्षात घेता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या पावसावर पिण्याच्या आणि सिंचनाचा प्रश्न अवलंबून असतो. शिवाय रब्बी हंगामालाही मदत होते, असे भुसे यांनी सांगितले.
दुष्काळ जन्यस्थिती निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी जलज लक शर्मा यांनी मंगळवारी कृषी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना पाणी नियोजन आणि चारा नियोजनाच्या सूचना दिल्या आहेत.