नाशिक : मुस्लीम समाजातील गरीब-श्रीमंतीची दरी कमी व्हावी, समाजाचा सर्वांगीण विकास साधला जावा या उद्देशाने जुने नाशिकमधील युवा आदर्श मल्टीपर्पज संस्थेच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात दहा मध्यमवर्गीय युवक-युवतींचा सामुदायिक ‘निकाह’ पारंपरिक पद्धतीने पार पडला.युवा आदर्श संस्था जुने नाशिक परिसरात मागील सात वर्षांपासून हा उपक्रम राबवित आहे. रविवारी (दि.२०) झालेल्या मुस्लीम सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी नाशिक, मालेगाव, वैजापूर, मुंबई या शहरांमधूनही नोंदणी झाली होती. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ धर्मगुरू हजरत सय्यद मौलाना मोईनुद्दीन अशरफ उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे, शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी, आमदार देवयानी फरांदे, योगेश घोलप, नगरसेवक समिना मेमन यांच्यासह समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते. दहा वधू-वरांचा सामूहिक निकाहचा विधी पारंपरिक व इस्लामिक धार्मिक पद्धतीने हजरत सय्यद मीर मुख्तार यांनी पार पाडला.सर्व विवाहबद्ध जोडप्यांना संस्थेच्या वतीने एकसमान संसारोपयोगी वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. तसेच दहा वधू-वरांकडून आलेल्या वºहाडी मंडळींकरिता भोजनाचीदेखील व्यवस्था संस्थेकडून करण्यात आली होती.यावेळी अशरफ यांनी राज्यातील काही भागांत असलेले दुष्काळाचे सावट दूर व्हावे, तसेच भारत प्रगतीची शिखरे सर करो अणि येथील राष्टÑीय एकात्मता अखंडितपणे जोपासली जावो, यासाठी विशेष प्रार्थना (दुआ) केली. तसेच विवाहबद्ध वरांना शुभाशीर्वाद देत त्यांच्या सुखी-समाधानी वैवाहिक आयुष्याकरिता प्रार्थना केली. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष बबलू शेख यांनी केले. दरम्यान, गोडसे, फरांदे यांनीही आपल्या मनोगतामधून नववधू-वरांना शुभेच्छा दिल्या.सामूहिक निकाह सोहळ्याची आज गरजमुस्लीम समाजाच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी तसेच विवाहसोहळ्यांवर होणारा अनावश्यक खर्च टाळून गोरगरिबांचा आत्मविश्वास अधिकाधिक बळकट करण्यासाठी सामूहिक ‘निकाह’ सोहळा गरजेचा असल्याचे मत ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना सय्यद मोईनुद्दीन अशरफ यांनी यावेळी व्यक्त केले. समाजाने शैक्षणिक स्तर उंचविण्याकडे अधिक लक्ष देऊन विवाह सोहळे साधेपणाने करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
दहा मुस्लीम जोडप्यांचा ‘निकाह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:41 AM