नांदगाव तालुक्यातील आमोदे येथील शिवारात दहा मोर मृतावस्थेत आढळून आल्यानं वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. मृतावस्थेत आढळलेल्या मोरांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली असून विषबाधेमुळे मोरांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आमोदे शिवारातील गिरणा-मन्याड नदीचे पात्र असल्यानं गेल्या काही दिवसांपासून मोरांची संख्या या ठिकाणी वाढलेली आहे. अन्न आणि पाण्याच्या शोधात हे मोर या भागात मोठ्या संख्येने येतात. शनिवारी या भागात अन्न-पाण्यासाठी दाखल झालेला मोरांचा थवा तडफडून मृत झाला. १० मोरांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत्य झालेल्यांमध्ये चार लांडोर व सहा मादी यांचा समावेश आहे. मृत्य झालेल्या मोरांचे शवविच्छेदन वेहेळगाव येथील पशु वैद्यकीय रुग्णलायत होणार आहेत. अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
आमोदे परिसरात सध्या पेरणीची कामे चालू असून कपाशी आणि मका पेरणी सुरु आहे. अशातच अन्न पाण्याच्या शोधार्थ आलेल्या मोरांनी पीक पेरा खाल्ल्याने विषबाधेमुळे मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. परंतु शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच खरे कारण सांगता येईल, असे आरएफओ चंद्रकांत कासार यांनी सांगितले.