दिंडोरी : नाशिक कळवण मार्गावरील दिंडोरी शहरातील श्रीमंत योगी कॉम्प्लेक्समध्ये गुरुवारी (दि. ९) रात्री दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दहा दुकानांचे शटर तोडून दुकानातील मशिनरीसह मुद्देमाल लंपास केला आहे. दिंडोरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक कळवण राज्य मार्गावरील. श्रीमंत योगी कॉम्प्लेक्समधील गाळा क्र. १, २, ३, ४, ७, ८, ९ व १० या आठ दुकानांचे शटर तोडून दुकानामधील वाहनांच्या बॅटऱ्या, व्हील अलाइन्मेंटची मशिनरी, कॉम्प्युटर असा दोन लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे.
याबाबत व्यावसायिक बापू रघुनाथ पाटील यांनी दिंडोरी पोलिसांत फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस साहाय्यक निरीक्षक श्रीमती चचड, पोलीस हवालदार पी. के. नवले, आदींसह पोलीस कर्मचारी करीत आहेत.