नाशिक : नाशिकच्या तिन्ही शाही पर्वण्या पार पडून आठवडा झाल्याने अवघे साधुग्राम रिकामे झाले. तिसरी पर्वणी पूर्ण होताच खालशांनी बस्तान गुंडाळण्यास प्रारंभ केल्याने ‘राम’ नामाने गजबजणारे साधुग्राम ओस पडले आहे. सध्या तपोवनात १० ते १५ खालशांचा मुक्काम मंगळवारपर्यंत आहे. तिसऱ्या पर्वणीनंतर साधू-महंत आपापल्या आश्रमात परतले आहेत. मात्र साधूंच्या खालशातील साहित्य त्यांचे भक्तगण नियोजित स्थळी पोहचविण्याचे कार्य करीत आहेत. पावसाने गेल्या दोन दिवसांपासून उघडीप दिल्याने खालशातील साहित्याच्या आवर सावर करण्याच्या कामाला कामगारांनी वेग दिला आहे. येत्या दोन दिवसांत जवळपास बहुतांश खालशांचे साहित्य रवाना होणार आहे. अद्यापही मंडपाचा मोठा विस्तार असलेल्या खालशात साहित्यांची आवर सावर सुरू असल्याचे दिसून येते. २९ सप्टेबरपर्यंत काही खालशांच्या साधंूसह भक्तगणांचा मुक्काम आहे. मात्र त्यानंतर एकही खालशा याठिकाणी मुक्कामी थांबणार नसल्याचे साधूंकडून सांगण्यात येत आहे. मुक्कामी थांबलेल्या खालशामध्ये ‘राम’ भजनाचा कार्यक्रम साधू-भक्तांकडून सुरू आहे. तिसऱ्या पर्वणीनंतर पावसाने संततधार सुरू केल्याने खालशामध्ये पाणी साचले होते. त्यामुळे साधंूसह भक्तगणांना रात्र जागून काढावी लागली होती. पाऊस सतत असाच सुरू राहिल्यास वास्तव्य करण्यासाठी अडचणी वाढणार असल्याने काही खालशांनी पर्वणी होताच बस्तान गुंडाळून रवाना झाले. तिसरी पर्वणीनंतर १९ सप्टेंबरपासूनच तपोवनातील काही खालशांतील साधू महंत सामान भरून आश्रमात रवाना झाले. साधू-महंतांना उज्जैनच्या कुंभमेळ्याचे वेध लागल्याने खालशांनी वाहनात साहित्य भरून नियोजित ठिकाणी पाठविले. उज्जैनमध्ये भेटण्याचे एकमेकांना सांगत साधंूसह भक्तगणांनी एकमेकांचा निरोप घेतला. उज्जैन कुंभ मे आवे, अशा शब्दात त्यांनी परतीवेळी संवाद साधला. दिगंबर, निर्वाणी, निर्मोही या तिन्ही अनी आखाड्यात साहित्य आवर सावरण्याचे काम सुरू आहे. सेक्टर दोनमधील गणेशदास महाराज यांच्या हनुमान खालशात ‘राम’भजनाचा अखंड कार्यक्रम अजूनही सुरू आहे. खालशे मोठ्या प्रमाणात रिकामे झालेल्या जागेत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. खालशामध्ये साहित्य भरताना प्लॅस्टिक पिशव्या, जेवणाच्या कागदी पतरवाळ्या तशाच पडून राहिल्याने कचरा सर्वत्र नजरेस पडत आहे. (प्रतिनिधी)
दहा खालशांचा मंगळवारपर्यंत मुक्काम
By admin | Published: September 26, 2015 11:02 PM