नाशिक : मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी घेण्यात येणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेतील महत्त्वाची समजली जाणारी लेखी परीक्षा रविवारी (दि.१४) शहरातील दहा केंद्रांवर घेण्यात आली. यावेळी दहा हजार उमेदवारांनी परीक्षा दिली. सर्व केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्तात शांततेत परीक्षा प्रक्रिया पार पडली.
कोरोनाची स्थिती, एसटीच्या चालक-वाहकांनी पुकारलेला संप आदि कारणांमुळे उमेदवारांची गैरसोय होऊ नये, यासाठी शहरासह नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांकरिता शहरात परीक्षा आयोजित केली गेली. राज्यात पोलीस भरती प्रक्रिया कोरोनाच्या अगोदरपासून रखडली असून, या जागा भरण्यासाठी आता प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. स्थानिक पातळीवर शहर व जिल्ह्यातील उमेदवारांकरिता शहरातील विविध दहा केंद्रांवर परीक्षा घेतली गेली. यावेळी मुंबई पोलीस आयुक्तालयातील भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली.
भरती प्रक्रियेत नाशिक पोलीस आयुक्तालयाचा तूर्तास सहभाग नसला तरी मुंबई पोलीस आणि राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी पोलीस भरती प्रक्रियेने वेग धरला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यातून मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या भरती प्रक्रियेसाठी हजारो उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. यामुळे मुंबई पोलीस आयुक्तालयाने उमेदवारांच्या लेखी परीक्षेचे आयोजन नाशिकमध्येच करण्याचे निश्चित केले. यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाला नियोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली. आयुक्तालयाकडून शहराच्या मध्यवर्ती भागातील शाळा, महाविद्यालयांची परीक्षा केंद्रे म्हणून निवड करण्यात आली होती.
शहर पोलिसांनी सर्व केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
---इन्फो--
या केंद्रांवर परीक्षा
शहरातील सिडको, सातपूर, नाशिकरोड, आडगाव या उपनगरांसह मध्यवर्ती भाग असलेल्या सारडा सर्कलवरील नॅशनल उर्दू कनिष्ठ महाविद्यालय, सारडा कन्या विद्यालय, गंगापूर रोडवरील मराठा हायस्कूल आदी केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रांवर उमेदवारांची गर्दी झाली होती.
--इन्फो--
केंद्रात कडक तपासणीनंतर प्रवेश
परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करत तापमान मोजणी तसेच सॅनिटायझरने निर्जंतुकीकरण करून उमेदवारांना सोडले जात होते, तसेच धातुशोधक यंत्राद्वारे पोलीस कर्मचाऱ्यांकडून प्रत्येक उमेदवारांची तपासणी केली जात होती. पादत्राणेदेखील काढून यावेळी चाचपणी करण्यात येत असल्याचे चित्र पहावयास मिळाले.