कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सोमवारी (दि.१५) जिल्हाधिकारी कार्यालयात आपात्कालीन व्यवस्थापन केंद्राच्या प्रमुखांची बैठक घेतली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली.
सध्या कोरोनाबाधित गृहविलगीकरणात मोठ्या प्रमाणात राहत असून त्यांच्याबाबत विशेष काळजी घेऊन संसर्ग रोखण्यात येईल, तसेच कोविड केअर सेंटर, डीसीएच, डीसीएसीदेखील गेल्या वेळीप्रमाणेच सुरू करण्यात येईल. ज्या भागात मोठ्या प्रमाणात आढळत आहेत, त्याच भागात कोविड केअर सेंटर्स सुरू करण्याची सूचना यावेळी गमे यांनी दिली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळेची क्षमता सध्या केवळ ८०० चाचण्यांचे अहवाल देण्याची आहे. ती आता वाढविण्यात येत असून त्यामुळे पाच हजार चाचण्यांची क्षमता या प्रयोगशाळेत होईल. २५ मार्चच्या आत महापालिकेच्या बिटको रुग्णालयातील लॅबही कार्यान्वित होणार असून, या प्रयोगशाळेची क्षमताही पाच हजार नमुने तपासणी प्रतिदिन असल्याने एका दिवसात दहा हजार नमुन्यांची तपासणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. या दोन्ही प्रयोगशाळांची क्षमता वाढणार असल्याने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि घसा स्राव नमुने तपासणीचे काम आणखी सोपे होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
बैठकीस महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस आयुक्त बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिवदे, आपात्कालीन कक्षाच्या समन्वयक उपजिल्हाधिकारी वासंती माळी आदी उपस्थित होते.
इन्फो...
पोलिसांना स्वतंत्र कारवाईचे आदेश
पोलीस यंत्रणा ही अन्य शासकीय यंत्रणेबरेाबर काम करीत असली तरी, या विभागाने आपत्ती व्यवस्थापन कायद्यासंदर्भातील निर्बंधाची अंमलबजावणी स्वयंस्फूर्तीने करावी आणि कार्यवाहीबाबतचे दैनंदिन अहवाल आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे रोज पाठवावेत, असे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.
इन्फो..
निर्बंधात आणखी वाढ नाही
गर्दीवर टाकण्यात येणाऱ्या निर्बंधाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून त्यात कोणतीही वाढ किंवा घट केली जाणार नाही. तसेच हेच निर्बंध पुढेही सुरू राहतील असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. गृहविलगीकरणात असणाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्याविराेधात फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मांढरे यांनी दिला.