नाशिक : उपनगर परिसरातील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) क्वार्टरमधील कार व दुचाकी अशा दहा वाहनांना अज्ञात समाजकंटकांनी आग लावून जाळल्याची घटना बुधवारी (दि़२) पहाटेच्या सुमारास घडली़ विशेष म्हणजे तीन-चार महिन्यांपुर्वी या ठिकाणी सरकारी वाहने जाळण्यात आली होती़ त्यातच पुन्हा सीआयएसएफ जवानांच्या वाहनांना लक्ष्य करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे़
उपनगर पोलीस ठाण्यात सीआयएसएफचे हवालदार संजयकुमार बनसोडे (५२, रा. क्वार्टर नंबर टाईप-2 ए, नेहरूनगर, उपनगरे) यांनी दिलेल्या फियार्दीनुसार मंगळवारी (दि. १) ते शासकीय दुचाकीने (एमएच १५, एए ८०१२) ते कर्तव्यावर आले होते़ बनसोडे हे घरात झोपलेले असताना बुधवारी (दि़२) पहाटे चार वाजेच्या सुमारास इमारतीच्या खालून आग लागली, आग लागली असा ओरड ऐकू आली़ यानंत ते तत्काळ खाली गेले असता सोसायटीच्या आवारात लावलेली सुमारे दहा वाहने जळत होती़ अज्ञात समाजकंटकांनी वाहनांना आग लावून पळ काढला होता़
दरम्यान, बनसोडे यांनी घटनेची माहिती वरीष्ठ तसेच अग्निशमन विभागस दिली़ या आगीत एमएच १५, एए ८०१४, व एमएच १५ एए ८०१६ या वाहनांसह बाजुच्या क्वार्टरमधील जेएच ०५ एएफ ९८४७, एमपी ४१ एमएस ८००६, एमएच १५ जीजी ०५८६, एमएच ०६ एएस १४८४ या क्रमांकांची दुचाकी व चारचाकी वाहने जळून खाक झाली आहेत. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़