----------------------
बँकांत गर्दी कायम; सामाजिक अंतर गायब
नांदूरशिंगोटे : राष्ट्रीयीकृत बँका व खासगी बँकांमध्ये पैसे भरणे, काढणे व बँकेच्या कामास नागरिकांची गर्दी होत आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बँक प्रशासनाकडून ठोस उपाययोजना आखण्याची गरज आहे. कोरोना नियमांचे पालन दोन्ही बाजूंनी होत नसल्याचे दिसून येते. ------------------------
पशुखाद्य महागल्याने शेतकऱ्यांची अडचण
नांदूरशिंगोटे : दुभत्या व कष्टाचे काम करणाऱ्या जनावरांना सरकी, ढेप, कडधान्यांचा कोंडा चारला जातो. यामुळे जनावरे सुदृढ राहून दूध जास्त देतात. वाढत्या महागाईचा फटका पशुखाद्यालाही बसला आहे. किमती दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे पशुपालक चिंताग्रस्त आहेत. बहुतांश शेतकरी चाऱ्याअभावी आपल्या जनावरांना बाजाराची वाट दाखवत आहेत.
---------------------
दातलीत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण
नांदूरशिंगोटे : प्राथमिक आरोग्य केंद्र, देवपूरअंतर्गत येणाऱ्या दातली उपकेंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत दातली उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या मुसळगाव, दातली, खोपडी, केदारपूर, शहापूर या गावांतील १०० नागरिकांना लस देण्यात आली.
---------------------
चापडगाव रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
नांदूरशिंगोटे : सिन्नर व अकोला या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर दापूर ते चापडगावदरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यावर जागोजागी खड्डे असल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे, तसेच अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे.