नाशिक : जीर्ण आणि गंजलेले पोल हटवून त्यासाठी नवीन पोल लावण्याच्या दहा कोटींच्या निविदा काढताना नगरसेवकांच्या सूचनेला केराची टोपली दाखवणे विद्युत विभागाला महागात पडले. मंगळवारी (दि.१७) महासभेत प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर अगोदरची निविदा रद्द करून पुन्हा नव्याने निविदा मागवण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.शहरातील ९२ हजार पथदीपांवरील फिटिंग्ज बदलून त्या जागी एलईडी फिटिंग्ज बसवण्याचे काम स्मार्ट सिटी अंतर्गत होत आहे. सडलेल्या आणि धोकादायक स्थितीत असलेल्या पोलच्या जागेवर एलईडी लाईट बसविण्यात येणार असून, तसे कंत्राटदाराशी करार करतानाच ठरले आहे. त्यामुळे गेल्या महासभेत शहरातील जुने बदलून त्याठिकाणी नवीन पोल बसविण्यासाठी दहा कोटी रुपयांच्या खर्चासाठी प्रशासकीय मंजुरीचा प्रस्ताव होता. मात्र, त्याविषयी अनेक शंका उपस्थित केल्यानंतर नगरसेवकांना न विचारता ठेकेदाराने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे किती पोल बदलायचे ते निश्चित करण्यात आल्याचे उघड झाले. यामुळे प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागातील पोलचे सर्व्हे करून त्याबाबत माहिती द्यावी आणि त्यानंतर निविदा काढावी, असे ठरविण्यात आले होते. मात्र, त्यानंतरदेखील प्रशासनाने परस्पर निविदा काढल्याने मंगळवारी (दि. १८) महापालिकेच्या महासभेत संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर सभागृहाचा कल बघता महापौर सतीश कुलकर्णी यांनी अगोदर काढलेली निविदा रद्द करून नव्याने निविदा मागविण्याचे आदेश दिले आहेत. त्यात नगरसेवकांनी सुचवलेल्या पथदीप बदलाचा ठराव अंतर्भूत करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
‘पोलखोल’नंतर दहा कोटींची निविदा रद्द होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 12:36 AM
जीर्ण आणि गंजलेले पोल हटवून त्यासाठी नवीन पोल लावण्याच्या दहा कोटींच्या निविदा काढताना नगरसेवकांच्या सूचनेला केराची टोपली दाखवणे विद्युत विभागाला महागात पडले. मंगळवारी (दि.१७) महासभेत प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर अगोदरची निविदा रद्द करून पुन्हा नव्याने निविदा मागवण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.
ठळक मुद्देमहासभेत प्रशासनाला धरले धारेवर