नाशिक : कोणत्याही ठेक्याची मुदत संपण्यापूर्वीच तीन महिने अगोदर निविदाप्रक्रिया राबविण्याचे स्पष्ट आदेश स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी प्रशासनाला पुन्हा एकदा दिले. यावेळी मनपा कर्मचाºयांसाठी रेनकोट खरेदी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना करतानाच अत्यावश्यक औषधांची खरेदी आयुक्तांच्या अधिकारात करून उर्वरित खरेदीसाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्याचेही आदेशित करण्यात आले. दरम्यान, सदस्यांनी सुमारे दीड कोटी रुपयांच्या औषध खरेदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.स्थायी समितीच्या सभेत तारांगण प्रकल्प पीपीपी तत्त्वावर चालविण्यास देणेपूर्वी एक वर्षासाठी पूर्वीच्याच मक्तेदाराकडून काम करून घेण्याचा विषय चर्चेला आला असता, शशिकांत जाधव यांनी महापालिकेला या प्रकल्पापासून आजवर किती उत्पन्न मिळाले, याचा लेखाजोखा सादर करण्याची सूचना प्रशासनाला केली. यावेळी शहर अभियंता उत्तम पवार यांनी सन २००७ पासून सुरू झालेल्या तारांगण प्रकल्पाच्या माध्यमातून आतापर्यंत ५० लाख रुपये उत्पन्न प्राप्त झाल्याचे सांगितले. मात्र, देखभाल-दुरुस्तीवर दोन कोटी २० लाख रुपये खर्च झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सभापतींनी पीपीपी तत्त्वावर लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. याचवेळी, मनपा कर्मचाºयांना रेनकोट देण्यासंबंधीचा विषय चर्चेला आला असता प्रवीण तिदमे यांनी पावसाळ्यातील दोन महिने संपल्यानंतर आता रेनकोट खरेदीची प्रक्रिया राबविली जात असल्याबद्दल खेद व्यक्त केला. पावसाळ्यापूर्वीच निविदाप्रक्रिया का राबविली नाही, याचा जाबही त्यांनी विचारला. यावेळी प्रशासन उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी गेल्या दीड वर्षांपासून सदरची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत दोन ते तीन वेळा फेरनिविदाही काढण्यात आल्याचे स्पष्ट केले. त्यावर सभापतींनी ठेका संपण्यापूर्वीच तीन महिने अगोदर निविदाप्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशित केले.
मुदत संपण्यापूर्वीच निविदाप्रक्रिया राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 5:42 PM