मालेगाव : तालुक्यातील आघार बुद्रुक व धवळेश्वर येथे कमानीवर लावलेल्या ध्वजावरून वाद झाल्याने दुपारी काहीकाळ तणाव निर्माण झाला होता: मात्र पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन बळाचा वापर करीत जमावाला पांगवले. पोलीस अधिकारी व तहसीलदार ज्योती देवरे यांनी मध्यस्थी केल्याने तणाव निवळला. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून, तेथे जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. आघार बुद्रुकला कमानीवर ग्रामदैवत तुळजाभवानी माता व धवळेश्वर येथील कमानीवर रु क्मिणी मातेचा ध्वज लावण्याचा ठराव ग्रामसभेमध्ये करण्यात आला होता. या ठरावाला काही लोकांचा विरोध होता. त्यामुळे या दोन्ही गावांत वाद होता. त्याचे रूपांतर तणावात झाले. तहसीलदार ज्योती देवरे यांनी दोन्ही समाजातील नागरिकांना एकत्र बसवत हा प्रश्न मिटवला. शनिवारी आघार बुद्रुक ग्रामस्थांनी ग्रामदैवत तुळजाभवानी मातेचा ध्वज वाजत गाजत लावला होता. परंतु रविवारी (दि.२६) दुपारी अचानक ध्वज लावण्याच्या कारणारून धुसफूस सुरू झाली. दोन्ही गट आमने-सामने उभे ठाकल्याची माहिती पोलिसांना कळताच तहसीलदार देवरे, ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे, वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुहास राऊत यांच्यासह पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनील बच्छाव घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला शांततेचे आवाहन केले. वाद वाढू लागल्याने पोलीसांना काहीसा बळाचा वापर करावा लागला. त्यानंतर गावात शांतता पसरली. दोन्ही गावातील परिस्थिती नियंत्रणात असून या घटनेशी संबंधीत पाच जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आघारसह धवळेश्वरला तणाव; पाच जण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 1:31 AM