नाशिक : पूर्व मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांकडून झालेला गोंधळ, घोषणाबाजीमुळे निर्माण झालेला तणाव वगळता विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि.२४) शहरात कडेकोट पोलीस व निमलष्करी दलाच्या बंदोबस्तात शांततेत पार पडली. विहितगाव येथे दोन राजकीय पक्षांचे कार्यकर्त्यांकडून दगडफेक करत कायदासुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न झाला; मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेत परिस्थितीवर तत्काळ नियंत्रण मिळवून समाजकंटकांना बळाचा वापर करत पांगविले.मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी चोख बंदोबस्ताचे सूक्ष्म नियोजन केले होते. त्यामुळे समाजकंटकांची पाचेवर धारण बसली. पूर्व मतदारसंघातील मतमोजणी हिरावाडी येथील मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे पार पडली. दरम्यान, दुपारी ३ वाजेपासून या मतमोजणी केंद्रावर गोंधळाचे वातावरण सुरू झाले. मतमोजणी यंत्र आणि तेथील कारभाराविरुद्ध कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँगेसच्या उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी हरकत घेत ‘मॅनेज’ मतमोजणी केली जात असल्याचा आरोप करत सुमारे तासभर प्रक्रिया बंद पाडली. दरम्यान, दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास केंद्राबाहेर मोठ्या संख्येने सानप समर्थक एकवटले. यावेळी जोरदार घोषणाबाजी महिला व युवकांकडून सुरू झाल्याचे समजताच तत्काळ उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दंगल नियंत्रण पथकाच्या जवानांसह केंद्राच्या परिसरात धाव घेतली. यावेळी पाटील यांनी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र तरीही काही अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून विनाकारण आक्षेपार्ह घोषणा देत वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यामुळे अखेर त्यांना दंगल नियंत्रण पथकाच्या जवानांनी (आरसीपी) हलकासा ‘प्रसाद’ देत पांगविले.यावेळी नऊ समाजकंटकांना पोलिसांनी ताब्यात घेत वाहनात डांबले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत या केंद्राबाहेर पोलिसांनी वाढीव बंदोबस्त तैनात करत बॅरिकेड लावून मतदान केंद्राच्या परिसरात मज्जाव करण्याची सीमा अधिकच वाढविली. दंगल नियंत्रण पथकाची तुकडी रात्रीपर्यंत येथे तळ ठोकून होती.कार्यकर्त्यांकडून दगडफेकीचा प्रयत्नशिवसेना-राष्टÑवादीचे कार्यक र्ते विहितगाव भागात सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास समोरासमोर आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली. दरम्यान, काही समाजकंटकांनी दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांची मोठी कुमक विहितगाव भागात दाखल झाली. तत्काळ जमावाला हलकासा बळाचा वापर करत पोलिसांनी पांगविल्याने तणावाची परिस्थिती वेळीच निवळण्यास मदत झाली. विहितगावात रात्री उशिरापर्यंत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पूर्वच्या मतमोजणी केंद्राबाहेर तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 1:48 AM