नाशिक : मनुष्य गेल्यानंतर त्याच्या दु:खावेगातून सावरणे कठीण असताना, अशाही परिस्थितीत समाजाचा विचार करणारे विरळेच. पण, जऊळके -वणी येथील पाटील कुटुंबीयांनी आपल्या तरुण मुलाच्या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात हृदयरोगावर जनजागृतीपर व्याख्यान आयोजित करून सामाजिक संवेदनेचा आदर्श समोर ठेवला.जऊळके-वणी गावाच्या शिवारातील एका प्रतिष्ठित शेतकरी पाटील कुटुंबीयांवर काही दिवसांपूर्वी दु:खाचा डोंगर कोसळला. या कुटुंबातील पस्तीशीच्या आतील युवकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूतून सावरत कुटुंबीयाने नुकतेच मयत सचिन बाळासाहेब पाटील यांच्या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात धार्मिक विधी आटोपून भजन, कीर्तनाऐवजी शहरातील हृदयरोगविकार तज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी सुमारे एक हजारांहून अधिक लोक दहाव्यासाठी जमले होते. समाजातील नागरिकांपर्यंत हृदयविकारासंबंधी असलेल्या गैरसमजुती दूर होण्यास मदत होईल आणि जागरूकता निर्माण होईल, या उद्देशाने पाटील कुटुंबीयांनी व्याख्यानाचा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासत एक वेगळा संदेश समाजाला दिला.वाढता ताणतणाव, स्पर्धा, बदलती आहारशैलीमुळे हृदयरोगाचा वयोगट अलीकडे कमी झाला आहे. ऐन तारुण्यात हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यूचे प्रमाण वाढत असून, ही चिंतेची बाब बनली आहे. यामुळे समाजात विशेषत: तरुणाईमध्ये हृदयविकाराविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे. पाटील कुटुंबीयांनी घातलेला हा पायंडा समाजात हृदयरोगाविषयी जनजागृती वाढविण्यासाठी पूरक ठरणारा आहे. हृदयरोगाविषयीची जनजागृती समाजात होणे गरजेचे आहे, हे लक्षात घेत आपल्या कुटुंबावर जसा प्रसंग बेतला तसा समाजातील अन्य कोणत्या कुटुंबावर येऊ नये, असा दूरदृष्टिकोन बाळगत जनजागृतीपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यांच्या या नावीन्यपूर्ण प्रयोगाचे जिल्ह्यात कौतुक होत आहे. दरम्यान, धर्माधिकारी यांनी हृदयरोगासंबंधी विविध माहिती देत घ्यावयाची दक्षता याविषयी मार्गदर्शन केले.मागील काही वर्षांत तरुणाईत हृदयरोगाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जनजागृती होणे गरजेचे आहे. समाजात हृदयरोगाविषयी विविध समज-गैरसमज असून, अशा प्रकारच्या कार्यक्रमांद्वारे ते दूर होण्यास मदत होईल. पाटील कु टुंबीयांनी केलेला हा नावीन्यपूर्ण प्रयोग नक्कीच समाजासाठी प्रेरणादायी आहे.- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, हृदयरोग तज्ज्ञरात्री झोपेतच माझ्या मुलाची हृदयविकाराने प्राणज्योत मालवली. हृदयविकाराविषयी जागृती व्हावी, या उद्देशाने व्याख्यानाच्या आयोजनाचा निर्णय घेतला. प्रवचन, कीर्तन, भजन लोकांनी आतापर्यंत खूप ऐकली आहेत; मात्र अशाप्रकारच्या जीवघेण्या आजाराविषयी समाजाला माहिती व्हावी, या उद्देशाने डॉ. धर्माधिकारी यांचे व्याख्यान आयोजित केले होते. सुमारे तासभर चाललेल्या या व्याख्यानाला शेकडोंच्या संख्येने उपस्थित असलेले नागरिक स्तब्ध होऊन ऐकत होते. - बाळासाहेब पाटील, वडील
दहाव्याला कीर्तन नव्हे, तर हृदयरोगावर व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 11:54 PM