प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांवर उपचार व भरती केली जाते. विशेष करून प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या यात अधिक असते. ग्रामीण भागातील महिलांची प्रसूती प्राथमिक आरोग्य केंद्रातच व्हावी, जेणेकरून बाळंतपणात महिला व बालकांचे मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे हा त्यामागचा हेतू आहे. दुर्गम भागातील महिलांना प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात ने-आण करण्यासाठीच या रुग्णवाहिका उपयोगी पडत असल्या तरी, त्याशिवाय गंभीर आजारी रुग्ण, अपघातग्रस्तांसाठीही प्राथमिक आरोग्य केंद्रातून जिल्हा रुग्णालय वा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची ने-आण करण्यासाठी या रुग्णवाहिका जीवदान ठरल्या आहेत. साधारणत: एक रुग्णवाहिका दिवसभरातून ५० ते १०० किलोमीटरचा प्रवास करते.
-----------
४० रुग्णवाहिकांची कार्यमर्यादा संपुष्टात
जिल्हा परिषदेच्या ताफ्यात असलेल्या ११२ रुग्णवाहिकांपैकी ४० रुग्णवाहिकांची कार्यमर्यादा संपुष्टात आली आहे. साधारणत: दहा वर्षे किंवा अडीच लाख किलोमीटरचा प्रवास इतकीच कार्यमर्यादा ठरवून देण्यात आली असून, परंतु रुग्णवाहिकांची गरज लक्षात घेवून सध्या या रुग्णवाहिकांचा वापर नाईलाजास्तव केला जात आहे.
---------
नवीन २० रुग्णवाहिका येणार ताफ्यात
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना चौदाव्या वित्त आयोगातून प्राप्त झालेला निधी बॅँकेत ठेवून त्याच्या व्याजापोटी मिळणाऱ्या रकमेतून कोरोना प्रतिबंधात्मक आर्सेनिक अल्बम खरेदी करण्याच्या शासनाच्या सूचना होत्या. तथापि, रुग्णवाहिकांची गरज लक्षात घेऊन सुमारे अडीच कोटी रुपयांतून २० नवीन रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे.
-------------
११२ प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका
जिल्ह्यातील १९०७ गावांसाठी ११२ प्राथमिक आरोग्य केंद्र व ५१९ उपकेंद्र असून, या उपकेंद्रांना त्या त्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी जोडण्यात आले आहे. या उपकेंद्रात उपचार घेणाऱ्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात ने-आण करण्यासाठी या रुग्णवाहिका उपयोगी पडतात.
---------------
दहा ते बारा रुग्णवाहिका रेफर
ग्रामीण रुग्णालयाशी जोडण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत ठेवण्यात आलेल्या रुग्णवाहिका गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालयात ने-आण करण्यासाठी दररोज दहा ते बारा रुग्णवाहिका रेफर केल्या जातात. त्यातून रुग्णांना वेळीच उपचार करण्यास मदत होती.
----------------
विम्याची नेहमीच काळजी
ग्रामीण भागातील रुग्णांची ने-आण करण्यासाठी कार्यरत असलेल्या सर्वच रुग्णवाहिकांचा विमा काढण्यात आला असून, दरवर्षी या विमा रकमेची परतफेड केली जाते. त्यामुळे रुग्णवाहिकाचा अपघात झाल्यास त्याची भरपाई संबंधित कंपनीकडून केली जाते.
-----------
प्राथमिक आरोग्य केंद्रातील बहुतांश रुग्णवाहिकांची कार्यमर्यादा संपुष्टात आली असली तरी, त्यांची देखभाल व दुरूस्ती वेळच्या वेळी केली जाते. परंतु, बऱ्याच वेळा दुरुस्तीसाठी वेळेवर निधी उपलब्ध होत नसल्याने नादुरस्त रुग्णवाहिका आरोग्य केंद्रातच पडून राहते.
- एक चालक
-------------------------
अनेक रुग्णवाहिकांची कार्यमर्यादा संपुष्टात आली आहे. अशावेळी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. रुग्णाची परिस्थती पाहून काही वेळा खासगी रुग्णवाहिकांची मदत घेऊन ने-आण करावी लागते.
- एक चालक
--------------------