नाशिक: विलीनीकरणाच्या मागणीसाठी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी झालेल्या एस.टी.तीलच ९ रोजंदारी कर्मचाऱ्यांवर महामंडळाने आता सेवा समाप्तीची कारवाई केली आहे. महामंडळाने ५१ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली होती. त्यातील नऊ जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
परीक्षा देऊन महामंडळाच्या सेवेत निवड झालेल्या या कर्मचाऱ्यांना सुरुवातीला रोजंदारी म्हणून काही दिवस कामकाज करणे अपेक्षित असते. त्यानंतर त्यांना मूळ सेवेत घेतले जाते. असे विभागात ५१ कर्मचारी नियुक्त होते. या कर्मचाऱ्यांनी देखील एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपात सहभाग घेतल्याने त्यांना महामंडळाने घरच्या पत्त्यावर नोटिसा पाठवून खुलासा मागविला होता; मात्र कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारे प्रतिसाद न दिल्याने अखेर त्यातील ९ जणांवर आता कारवाई करण्यात आली आहे. त्यांची सेवा समाप्त करण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्ह्यातील १३ डेपोमधील कर्मचारी सध्या संपावर असल्याने महामंडळाचे कामकाज ठप्प झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या या संपाला अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे तर महामंडळातीलच विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी देखील पाठिंबा दिला होता. त्याचप्रमाणे एस.टी.तील कर्मचाऱ्यांनी देखील पाठिंबा दिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अगोदर ३१ कर्मचाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर उर्वरित कर्मचाऱ्यांना नोटिसा दिल्याने नोटीस बजाविण्यात आलेल्यांची संख्या ५१ इतकी आहे. समाधानकारक उत्तरे न देणाऱ्या एकूण ९ कर्मचाऱ्यांची सेवा थेट समाप्त करण्यात आली असल्याचे समजते.