सटाणा : शहरवासीयांना दीड ते दोन तपांपासून ज्या आश्वासनाची प्रतीक्षा होती त्याची लवकरच अपेक्षापूर्ती होणार आहे. शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी शाश्वत जलस्रोत निर्माण होण्यासाठी शहराजवळ आरम नदीवर बंधारे बांधण्यास मान्यता मिळाली आहे. शुक्रवारी स्थानिक स्तर विभागाकडून नदीपात्रात भूगर्भ चाचणी करण्यात आली. पाणीटंचाईतून कायमस्वरूपी सुटका होण्यासाठी हे दोन बंधारे संजीवनी ठरणार असल्याने शहरवासीयांमधून समाधान व्यक्त होत आहे.उन्हाळ्यात परिसरात पाण्याची भयावह स्थिती उद्भवते. पाणीटंचाईतून नागरिकांची सुटका करण्यासाठी आरम नदीवर बंधारे बांधण्याचे आश्वासन प्रत्येक निवडणुकीत इच्छुक उमेदवारांकडून हमखास दिले जात होते. परंतु राजकीय इच्छाशक्तीअभावी प्रत्यक्ष आश्वासनपूर्ती एक दिवास्वप्न ठरले होते. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रयत्नांतून केंद्र शासनाने पाच एमसेफिटक पाणी अडविण्यास परवानगी दिल्यानंतर मार्ग मोकळा झाला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत डॉ. भामरे यांनी भाजपाच्या वतीने तर विद्यमान नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी शहर विकास आघाडीच्या वतीने नदीवर बंधारे साकारण्याचे आश्वासन दिले होते. शहरवासीयांनी एकत्रित येऊन सत्ता स्थापनेचा कौल दिल्याने मोरे, उपनगराध्यक्ष निर्मला भदाणे, गटनेते संदीप सोनवणे आणि सर्व नगरसेवक तसेच डॉ. शेषराव पाटील यांनीही बंधाऱ्यांच्या कामाबाबत प्राधान्याने पाठपुरावा केला. संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गास तातडीने अपेक्षित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार राज्याचे उपसचिव एस. ए. टाटू यांनी जलसंपदा विभागाला ना हरकत प्रमाणपत्र देत साठवण बंधारे बांधण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार शुक्रवारी स्थानिक स्तर विभागाकडून नदीपात्रात भूगर्भ चाचणी करण्यात आली. (वार्ताहर)
‘आरम’वर दोन बंधाऱ्यांची भूगर्भ चाचणी
By admin | Published: April 23, 2017 1:35 AM