चांदवड : येथील रेणुका मंदिराजवळील घाटाच्या पायथ्याशी उलटलेल्या ट्रकखाली दबून दुचाकीस्वार ठार झाला. मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड येथील रेणुका देवी मंदिराच्या घाट पायथ्याशी चांदवड येथून दुचाकीने राहुड येथे एकनाथराव शंकर पवार (वय ७५) हे जात असताना त्यांच्यापुढे रेणुका देवी घाटापुढे युरिया घेऊन जाणारा ट्रक मोसम तुटल्यामुळे मागे येऊन उलटला. त्या गाडीच्या पाठीमागे दुचाकीस्वार एकनाथराव शंकर पवार हे गाडीखाली दबल्याने जागीच ठार झाले.
एकनाथ पवार हे सामाजिक कार्यकर्ते गणपतराव पवार यांचे बंधू होते. या घटनेची माहिती सोमा टोल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य केले. यावेळी पोलिस निरीक्षक कैलास वाघ, उपनिरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, पिंपळगाव महामार्गावरील पोलिस कर्मचारी, पोलिस हवालदार सदगीर, मुलमुले, पोलिस नाईक बोडके, गांगुर्डे, वाघ आदींनी घटनास्थळी जाऊन नागरिकांच्या मदतीने गाडीखाली दबलेल्या पवार यांना काढण्यासाठी दोन हायड्रोलिक क्रेन मशिन लावून बाहेर काढले.
दरम्यान, एकनाथ पवार यांचा मृतदेह चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालया आणण्यात आला होता. त्यांची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.