पाळे खुर्द : गोसराणे येथील प्रगतशील शेतकरी विश्वास मोरे यांच्या बार्डे शिवारातील नदीलगतच्या मळ्यात मंगळवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास एकाचवेळी चार बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात एक बैल व एक शेळी जागीच ठार झाली, तर हल्ल्यात बचावलेला बोकड देखील मरणासन्न अवस्थेत आहे.
विश्वास मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून या परिसरात बिबट्यांचा वावर असून, मागीलवर्षी ज्या मादी बिबट्याला चार पिलांसह पाहण्यात आले होते, तीच पिल्ले आता मोठी झाली असून, आता समूहाने पाळीव जनावरांवर हल्ला करीत असल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे.
बार्ड व गोसराणे परिसरात अनेक ठिकाणी पिंजरे लावून देखील एका बिबट्याला जेरबंद करणे अवघड होते आहे, त्याचठिकाणी आता चार बिबट्यांचा वावर हा स्थानिक शेतकरी यांच्यासाठी मोठा चिंतेचा विषय बनला आहे.
चौकट...
कळवण वन विभाग परिमंडळअंतर्गत सद्यस्थितीला २ पिंजऱ्यांची उपलब्धता असून, वन कर्मचारी सुरगाणा येथील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी गेलेले असल्याने तात्काळ उपाययोजना करता येणे शक्य नसल्याचे वन कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. बिबट्यांच्या दहशतीमुळे ऊस आणि मक्यातील तण काढणीसाठी मजूर मिळत नसल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.
बिबट्यांमुळे जमीन ठेवली कोरडवाहू
विश्वास मोरे यांनी या बिबट्यांच्या सततच्या वावरामुळे गेल्या दोन वर्षांपासून आपली सात एकर जमीन कोरडवाहू ठेवली आहे. समूहाने हल्ला करणाऱ्या या बिबट्यांमुळे अन्य दुर्घटनेला सामोरे जाण्याआधीच वन विभागाने तात्काळ चार पिंजऱ्यांची व्यवस्था करावी व गोसराणे शिवारातील शेतकरी, शेतमजूर, ग्रामस्थ यांना भयमुक्त करावे, अशी विनंती केली जात आहे.
(२० पाळे)