नाशिक : पाकिस्तान मुर्दाबाद..., नवाज शरीफ मुर्दाबाद..., शहीद जवान अमर रहें... च्या घोषणा देत जुने नाशिक, वडाळागाव परिसरात मुस्लीम समाजाने उरी येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला.पाकिस्तानचा दारूगोळा घेऊन काश्मीर खोऱ्यामध्ये सशस्त्र आत्मघाती दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या तळावर हल्ला केला होता. या हल्ल्यात १८ जवान शहीद झाले. या हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदविला गेला आहे. शहरातील मुस्लीम संघटनांनीदेखील पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. पाकिस्तान से अब गोली की बात करो..., दहशतवादी संघटना को बर्बाद करो... अशा घोषणा देत पाकिस्तान व दहशतवादाचा निषेध करण्यात आला.खडकाळी येथे युवा सोशल मल्टीपर्पज संस्थेच्या वतीने शरीफ यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच पाकविरोधी घोषणांसह दहशतवादी हाफीज सईदच्या निषेधाचे फलक यावेळी झळकविण्यात आले आणि प्रतीकात्मक पाक ध्वज व शरीफच्या छायाचित्रांवर जोडे मारून संताप व्यक्त केला. यावेळी असलम खान, गुलाम गौस पाटकरी, सोहेल खान, युनुस खान, एजाज शेख यांच्यासह मुस्लीम कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीनेही पाकिस्तानच्या या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजीज पठाण यांच्या नेतृत्वाखाली जुने नाशिकमधील चौक मंडई येथून मेणबत्ती मोर्चा काढून शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी मुश्ताक शेख, रफीक खान, आफताब सय्यद, जमील जानोरकर आदि उपस्थित होते. तसेच वडाळा गावात शिवसेनेचे पदाधिकारी हाजी नवाब शहा व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शरीफ यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. नुरी अकादमीच्या वतीनेही पाकिस्तानच्या या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
दहशतवादी हल्ल्याचा निषेध
By admin | Published: September 23, 2016 1:26 AM