स्व. निवृत्ती काका देवरे बाजार समिती व खारीपाडा येथील रामेश्वर कृषी बाजारातील नियमित कांदा खरेदीदार व्यापारी, बाजार समित्यांचे कर्मचारी, माथाडी कामगार आदी घटकांच्या गेल्या दोन दिवसांपूर्वी येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे अहवाल पाहूनच संबंधितांना प्रवेश दिला गेला असून लिलाव सुरू होण्याआधी संपूर्ण मार्केट यार्डात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. शिवाय कांदा विक्रीसाठी आलेल्या वाहनधारकांसह कांदा विक्रेत्या शेतकऱ्यांची थर्मामीटर तपासणीसह सॅनिटायझरचा वापर करून मार्केट यार्डात प्रवेश दिला गेला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या नवीन नियमांचे पालन होत असल्याचे चित्र दिसून आले आहे. बाजार समित्यांनी पाचशे वाहनांचीच नोंदणी करून प्रवेश दिला जाणार असल्याचे जाहीर केल्याने आवकेवर याचा परिणाम झाला आहे. बाजारभाव काय निघतो, याकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते. मात्र, लिलाव सुरू झाले तेव्हा मागील आठवड्याच्या तुलनेत पन्नास ते शंभर रुपयांची घसरण दिसून आली. उमराणे बाजार समितीत कमीत कमी ५०० रुपये, जास्तीत जास्त १६५१ रुपये तर सरासरी ११०० रुपये दराने कांदा विक्री झाला.
कांदा लिलाव पूर्ववत सुरू झाल्याने कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांची अडचण दूर झाली आहे. शिवाय कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे बाजार समितींना कोरोनाविषयक नियम बंधनकारक केल्याने याचा फायदा निश्चितच होणार आहे.
- बाळासाहेब मगर, शेतकरी, उमराणे
बाजार समितीने व्यापाऱ्यांसह इतर घटकांची कोरोना टेस्टचे नियम लागू केल्याने काही अंशी कोरोनाची भीती दूर झाली आहे. आगामी काळातही असेच नियम पाळण्याची गरज आहे.
- मुन्ना अहेर, कांदा व्यापारी, उमराणे