नाशिक : महापालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील २७ हजारांहून अधिक जागांसाठी सुमारे २८ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रवेशासाठीच्या उपलब्ध जागांच्या तुलनेत विज्ञान व वाणिज्य शाखांसाठी सर्वाधिक विद्यार्थ्यांचे अर्ज असल्याने यंदा गुणवत्ता यादीत जागा मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची कसोटी लागणार आहे. यावर्षी दहावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्याही सर्वाधिक आहे. त्यामुळे पहिल्या गुणवत्ता यादीत विज्ञान शाखेसाठी ९४ ते ९५ टक्क्यांपर्यंत तर वाणिज्य शाखेसाठी ९० टक्क्यांच्या पुढे राहण्याच्या अंदाज व्यक्त केला जात असून, नामांकित महाविद्यालयांमध्ये कला शाखेची जागा मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची कसोटी लागणार असल्याने विद्यार्थ्यांचे लक्ष गुणवत्ता यादीकडे लागले असून, प्रवेशासाठी मोठी कसरत करावी लागू शकते. शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रि या होत असून, पहिल्या गुणवत्ता यादीसाठी २७ हजार ९१६ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज दाखल झाले. त्यात विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक अर्ज आले असून अकरावी प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी ५ जुलैला जाहीर होणार आहे.सर्वसाधारण गुणवत्ता यादीवर २० हरकतीशहरात अकरावीच्या विज्ञान, वाणिज्य, कला व संयुक्त शाखा यांची ५७ कनिष्ठ महाविद्यालये असून, त्यात प्रवेशाच्या २७ हजार ९०० जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी एकूण २३ हजार ८८४ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचे भाग एक व भाग दोन भरले असून, यात एसएससी बोर्डाचे २२ हजार ४३९, सीबीएसई बोर्डाचे ७५२, आयसीएसई ६२८ तर अन्य बोर्डाचे ६५ विद्यार्थी समाविष्ट आहेत. त्यापैकी कला शाखेसाठी ३ हजार ५४९, वाणिज्यला ९ हजार १२८, विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक १० हजार ६१४ व एमसीव्हीसीसाठी २८ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज प्राप्त झाले असून, यातील २० विद्यार्थ्यांनी २९ जूनला प्रसिद्ध झालेल्या गुणवत्ता यादीवर आक्षेप नोंदवला आहे. त्यांच्या हरकतींवर मंगळवारी (दि.३) निर्णय होणार आहे.
पहिल्या गुणवत्ता यादीसाठी कसोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 1:03 AM