नाशिक : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी शहरातील प्रशासकीय यंत्रणेकडून खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील धर्मदाय संस्थांच्या इमारतींना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील सोयीसुविधांचा आढावा घेतला. यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धर्मदाय रुग्णालये, वसतिगृहे व अन्य इमारतींमध्ये उपलब्ध बेड्स आणि अन्य सुविधांची चाचपणी केली असून, आपत्कालीन परिस्थितीत विलगीकरण कक्ष, भोजन वितरण प्रणाली अशा सेवांसाठी या इमारतींचा वापर करण्याच्या दृष्टीने प्रशासनाची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नाशिक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किरण सोनकांबळे, आरोग्य विभागाच्या उपमुख्य वैद्यकीय अधिकारी अजिता साळुंके, उपमहाव्यवस्थापक किसन कानडे, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी नामको हॉस्पिटलमधील सेवा सदनाला भेट देऊन तेथील निवासासह अन्य सुविधांची गुरुवारी पाहणी केली. त्याचप्रमाणे जैन ओसवाल बोर्डिंग, नामको हॉस्पिटल, चोपडा एम्पायर, आदिवासी विभागाची वसतिगृहे, धर्मशाळा अशा विविध ठिकाणांना भेटी देत तेथील सुविधांची माहिती घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांचे विलगीकरणाच्या दृष्टीने या ठिकाणांच्या निर्जंतुकीकरणाच्या सूचनाही या अधिकाºयांनी संबंधित संस्थांना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे रुग्णालयातील उपलब्ध सोेयीसुविधांची त्यांनी माहिती घेतली. यावेळी नामको चॅरिटेबल ट्रस्ट, जैन ओसवाल बोर्डिंगचे सेक्रेटरी शशिकांत पारख व विश्वस्त यांच्यासह हॉस्पिटलचे अधिकारी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेसाठी नामको बँकेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी, जैन ओसवाल बोर्डिंगचे अध्यक्ष हरिष लोढा, चोपडा एम्पायरचे संचालक सुनील चोपडा, विलास शहा, शरद शहा, भारतीय जैन संघटनेचे नंदू साखला, गजपंथ देवस्थानच्या सुवर्णा काले, जितो संस्थेचे शांतीलाल बाफणा, सतीश हिरण, प्लॅटिनम ग्रुपचे यश टाटिया, सम्यक सुराणा, जैन सोशल ग्रुपचे प्रवीण संचेती, अर्पण रक्तपेढीचे नंदकुमार तातेड, अतुल जैन, तसेच पंकज पाटणी अशा जैन समाजातील विविध संस्थांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीसाठी तयारी दर्शविली होती.
नाशकात आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी धर्मादाय संस्थांची चाचपणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 7:09 PM
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धर्मदाय रुग्णालये, वसतिगृहे व अन्य इमारतींमध्ये उपलब्ध बेड्स आणि अन्य सुविधांची चाचपणी केली असून, आपत्कालीन परिस्थितीत विलगीकरण कक्ष, भोजन वितरण प्रणाली अशा सेवांसाठी या इमारतींचा वापर करण्याच्या दृष्टीने प्रशासनाची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठळक मुद्दे कोरनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची दक्षता आपात्कालीन स्थितीचा सामना करण्याची तयारी धर्मदाय संस्थांमधील सोयी सुविधांची पाहणी