नाशिक : डीएड, बीएड अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदमार्फत टीईटी-२०२१ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून शिक्षक पात्रता परीक्षा होऊ शकली नाही. दोन वर्षांनंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये महाटीईटी घेण्यात येणार आहे. यावर्षी फॉर्म ऑनलाइन भरण्याच्या प्रक्रियेमध्ये डीएड आणि बीएड अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना या परीक्षेची संधी देण्यात आलेली नव्हती. मागील प्रत्येकवेळी परीक्षा परिषदने डीएड आणि बीएड शेवटच्या वर्षधारक विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी देण्यात येत होती, परंतु यावर्षी ऑनलाइन अर्जामध्ये तशी व्यवस्था करण्यात आली नव्हती. कोरोनामुळे या अभ्यासक्रमाच्या परीक्षा झालेल्या नाहीत. त्यामुळे संधी नाकारण्यात येत असल्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेर शासनाने अशा विद्यार्थ्यांना संधी देण्यात येत असल्याचे जाहीर केले. राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद धोरणाशी सुसंगत राहून अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना शिक्षक पात्रता परीक्षेस बसण्यास मुभा देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले
--
जिल्ह्यात डीएडच्या अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी -१२५०
बीएडच्या अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी - १७५०
--
५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार डीएड आणि बीएड विद्यार्थ्यांची अंतिम वर्षाची परीक्षा करोनामुळे वेळेवर घेण्यात आलेली नाही आणि त्याचा निकाल लागला नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना महाटीईटी देता येणार नाही आणि त्यानंतर होणारी अभियोग्यता चाचणी तीपण देता येणार नाही, असे सांगत डीएड, बीएएड पात्रताधारक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी ३ ऑगस्टपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळाली आहे. त्यात या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
विद्यार्थी काय म्हणतात..
---
अंतिम वर्षात टीईटी परीक्षा देता आली तर ही परीक्षा लवकर उत्तीर्ण होऊन अभ्यासक्रम पूर्ण होताच नोकरीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करता येऊ शकेल. त्याचप्रमाणे अभ्यासाचा सराव असल्याने परीक्षाही सोपी होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना फायदाच होणार आहे.
- अनिकेत जाधव, विद्यार्थी
---
शिक्षक पात्रतेसाठी ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळाली आहे. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असून, विद्यार्थी शिक्षण सुरू असताच शिक्षक पात्रता परीक्षाही देऊ शकतील.
- अंजली पवार, विद्यार्थिनी