नाशिक : जिल्हा परिषद, महापालिकेच्या शाळांमध्ये तसेच शासकीय व खासगी अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार असून, शाळेच्या पहिल्याच दिवशी या पाठ्यपुस्तकांचे वितरण होणार आहे. जिल्ह्यातील मराठी, हिंदी, उर्दू व इंग्रजी माध्यमांच्या एकूण चार हजार २३० शाळांमध्ये पाच लाख ३७ हजार ५३१ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील महापालिका व जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांसह खासगी संस्थांच्या अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप उन्हाळी सुटी संपल्यानंतर दि. १५ जूनला शाळेची पहिली घंटा वाजताच करण्यात येणार आहे. यो योजनेअंतर्गत सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशीच पाठ्यपुस्तक वितरण करता यावे यासाठी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी सोमवारी (दि. १६) पाठ्यपुस्तक वितरण करणाऱ्या गाडीचे उद्घाटन केले. अशा प्रकारे पाठ्यपुस्तक भांडारातून थेट तालुक्यापर्यंत ही पुस्तके पाठविली जाणार असून, तेथून शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थी संख्येनुसार पाठ्यपुस्तके घेऊन जाण्याचे नियोजन करावयाचे आहे. त्यानुसार जिल्ह्यातील मराठी माध्यमांच्या पाच लाख २५ हजार ९५१ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातील. तसेच उर्दू माध्यमाचे ९ हजार ६६४, हिंदीचे १६0 व इंग्रजी माध्यमाचे १ हजार ७५६ अशा एकूण पाच लाख ३७ हजार ५३१ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके देण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन आहे. विद्यार्थ्यांची गळती रोखणे व पुस्तकांअभावी शिक्षणापासून वंचित राहणाºया विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्व शिक्षा अभियान सुरू करण्यात आले असून, त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. परंतु, गेल्या वर्षी ही योजना बंद करून थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला होता. मात्र, त्यावर चौफेर टीका झाल्यानंतर सरकारने हा निर्णय मागे घेत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.लाभार्थ्यांनी पुस्तके खरेदी करू नयेजिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळांसह शासकीय आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये आठवीपर्यंत शिक्षण घेणाºया सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने शाळांनी नियोजन केले असून, पालकांनी बाजारातून पाठ्यपुस्तकांची खरेदी करू नये, असे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार पाठ्यपुस्तके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:34 AM