नाशिक : १९९४ मध्ये नाशिकमध्ये महाअधिवेशन घेतल्यानंतर शिवसेनेची राज्यात सत्ता आली होती. त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी ठाकरे गटाच्या वतीने नाशिकमध्ये नव्या वर्षात २२ आणि २३ जानेवारी रोजी महाअधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात नाशिकमध्ये आलेल्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात प्राथमिक चर्चा केली हेाती. तसेच पुढील महिन्यात नाशिकमध्ये राज्यव्यापी कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी २३ डिसेंबर २०२३ किंवा २३ जानेवारी २०२४ अशा दोन तारखांबाबत चर्चा करण्यात आली होती.
सर्वांची सोय बघून यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार होता. मात्र, आता शिवसेनेने २२ आणि २३ जानेवारी २०२४ नाशिकमध्ये ठाकरे गटाचे महाअधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार असून त्यानंतर विधानसभा निवडणुका हेाणार आहे. त्यामुळे १९९४ प्रमाणेच आताही आई जगदंबेला दार उघड बये दार उघड असे साकडे घालण्यात येणार आहे. राज्यात शिवसेनेत फुट आणि नंतर सत्तांतर झाल्यानंतर अस्वस्थ असलेल्या शिवसैनिकांना यातून आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.