राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विवाह सोहळ्याबाबतही शासनाने कडक नियमावली केली आहे. त्यामुळे माेजक्या नातेवाइकांव्यतिरिक्त कार्यकर्ते व वऱ्हाडी मंडळींना या विवाह सोहळ्यात ‘नो एन्ट्री’ होती. मीडियालाही या सोहळ्यात प्रवेश देण्यात आला नाही. फार्म हाउसच्या गेटवर ‘परवानगीशिवाय आत येऊ नये’ असा फलक लावण्यात आला होता. मात्र विशेष अतिथी व त्यांच्या वाहनांना परवानगी देण्यात येत होती. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद दिले, तर जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ या विवाह सोहळ्यात ऑनलाइन सहभागी झाले होते. मतदारसंघाच्या नागरिकांना या विवाह सोहळ्याला हजेरी लावता यावी यासाठी फेसबुक व युू-ट्यूबवरून लाइव्ह करण्यात आले होते. यासाठी डिजिटल पत्रिका व्हायरल करून लिंक देण्यात आली होती.
कोट...
राज्यावर कोरोनाचे संकट आहे. सगळे लोक अडचणीत आहेत. त्यामुळे सामुदायिक विवाह सोहळादेखील रद्द करावा लागला. साध्या पद्धतीने मोजके वऱ्हाडी, नातलगांच्या उपस्थितीत मुलाचा विवाह सोहळा उरकला. कोरोनाचे संकट दूर झाले की सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन करून मुलाच्या लग्नाचा आनंद भरून काढू.
- दादा भुसे, कृषिमंत्री