लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : शहरासाठी संजीवनी ठरणारी केळझर पाणीपुरवठा योजना राजकीय संघर्षामुळे गुंडाळल्यानंतर आता पुनंद पाणीपुरवठा ही महत्त्वाकांक्षी योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असताना संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, नगराध्यक्ष सुनील मोरे, आजी-माजी आमदार चव्हाण दांपत्य यांच्यात पुन्हा एकदा श्रेयवाद पेटल्याने ही योजना राजकीय संघर्षात अडकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गुरुवारी नगराध्यक्ष सुनील मोरे आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी पुनंद योजनेसंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यानंतर शुक्रवारी आमदार दीपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण या दांपत्याने येथील शासकीय विश्रामगृहात योजना कोणी प्रस्तावित केली याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली. आमच्या मातोश्री नगराध्यक्ष असताना दि. १९ सप्टेंबर २०१५ रोजी पुनंद पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी बहुमताने ठराव मंजूर केला. त्यानंतर दि. ७ जुलै २०१६ रोजी शासन स्तरावर या योजनेसाठी पुनंद प्रकल्पामधून २.३६५२ दशलक्ष घनमीटर पाणी कायमस्वरूपी आरक्षित करून घेतले. या योजनेच्या सर्वेेक्षणसाठी दि. ११ सप्टेंबर २०१५ रोजी दहा लाख रुपयांची तरतूद करून सर्वेक्षण पूर्ण करून घेतले. या तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतरच आपण सादर केलेल्या प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी मिळाली. या योजनेला अंतिम मंजुरी मिळविण्यासाठी दि. १७ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, नगरसेवक काका सोनवणे, माजी नगराध्यक्ष विजय वाघ, पांडुरंग सोनवणे, भरत खैरनार, झिप्रूअण्णा पाटील, ज. ल. पाटील, धर्मा पाटील, आनंद सोनवणे, जनार्दन सोनवणे, नामपूरच्या सरपंच रंजना मुथा, सोनाली निकम, अशोक सावंत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता वानखेडे, निखील गीते आदी उपस्थित होते.
श्रेयवाद पेटला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:57 AM