नाशिक : राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आरक्षण प्रश्नावर मार्गदर्शनासाठी शरद पवार यांची भेट घेणे गैर नाही. मात्र जर भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना त्यातील काही समजत नाही असे उद्गार काढून पवार यांची भेट घेतली असेल तर ते अयोग्य असल्याचे मत पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केलं आहे. आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिन कार्यक्रमासाठी सोमवारी (दि. १५) नाशिक येथे आले असता पत्रकारांशी संवाद साधताना त्यांची हे वक्तव्य केले.
राज्य सरकारने यापुर्वीही मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. मराठा आरक्षण देताना ते कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता देण्याची भूमिका सरकारने आधीच जाहीर केली आहे. त्यापार्श्वभूमीवर शासकीय नोकऱ्यांमध्ये तजवीजही केली जाते आहे. अशा परिस्थीतीत या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी दाखल याचिकाही न्यायालयाने फेटाळल्या आहेत. राज्य शासनाच्या सर्वेक्षणानुसार मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करणारे सर्वेक्षण न्यायालयात सादर करण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यातील काहीच कळत नाही असे वक्तव्य हास्यास्पद असल्याची टीकाही भुसे यांनी केली.