मनमाड : धावत्या रेल्वे गाडीत पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत जबरी चोरी करून आपल्या गावी उत्तर प्रदेश येथे आरोपी पळून जात असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळताच. मनमाड रेल्वेस्थानकात शोधमोहीम सुरू करून सापळा रचून स्थानकात उभी असलेल्या रेल्वेगाडीतून संशयित आरोपीला पकडण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. संशयित आरोपीकडे ९० हजार रुपयांची रोख रक्कम मिळून आली. रांजणगाव पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक रोकडे व पोलिसांच्या पथकाकडे त्यास सुपुर्द करण्यात आले.
पुणे पोलिसांकडून याबाबतची माहिती व संशयित आरोपीचा फोटो सोशल मीडियाद्वारे मनमाड लोहमार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही वेळातच या आरोपीला गाडीतून ताब्यात घेतले. रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. पुणे परिसरात ही घटना घडली होती, तर रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्थानकात सदर गुन्हा दाखल होता. यातील संशयित आरोपी नवीन प्रदीप निषाद (वय २२, रा. कोरापट्टी, पो. सदर, जि. जौनपूर, उत्तर प्रदेश) याचा ठावठिकाणा घेतल्यानंतर हा आरोपी गाडी क्र. ११४२७ पुणे- गया या गाडीने त्याच्या गावी जात असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने मनमाड लोहमार्ग पोलीस स्थानकात ही माहिती दिली व संशयिताचा फोटोही सोशल मीडियाच्या व्हॉटस्ॲपवर दिला.
लोहमार्ग पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक अलर्ट झाले. उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या गाड्यांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. पुणे- गया मनमाड रेल्वेस्थानकात उभी असतानाच पोलिसांनी गाडीत शोधमोहीम सुरू केली आणि वर्णनाप्रमाणे संशयित मिळून आला. त्याला तेथेच पोलिसांनी जेरबंद केले.
उपनिरीक्षक मधुकर लोखंडे, कर्मचारी दिनेश पवार, संतोष भालेराव, संजय केदारे, संजय निकम, नीलेश कुसराम, महिला पोलीस कर्मचारी संतोषी राठोड व पो.ह. बच्छाव आदींनी बोगीमध्ये शोध घेऊन सदर आरोपीला पकडले.
---------------------