गणेश शेवरे
पिंपळगाव बसवंत: कांदा, टोमॅटो पाठोपाठ आता भाजीपाल्याचे भावदेखील मोठ्या प्रमाणात कोसळल्याने बळीराजा हताश झाला आहे. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत भाजीपाल्याला एक रुपया किलोचा दर मिळाला. संतप्त शेतकऱ्यांनी भाजीपाला लिलाव बंद पाडून आवारात ठिय्या मांडला.
समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पाण्याविना पिके जळून जात असताना शेतकरी धडपड करत भाजीपाला लागवड करत आहे. त्यातही बुधवारी (दि. ६) दोडका, घेवड्याला १ रुपया किलो दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत संताप व्यक्त केला. मजुरीचा तर सोडा साधा वाहतुकीचादेखील खर्च निघत नसल्याने शेतकरी संतप्त झाला आहे. गोकुळाष्टमीमुळे गुजरात बाजार पेठ बंद असल्याने व्यापाऱ्यांनी कमी भावाने शेतमाल खरेदी केला असल्याचे सांगण्यात आले.
बाजार समितीत टोमॅटोच्या २० किलोच्या कॅरेटला सरासरी १११ रुपये प्रतिकॅरेट, जास्तीत जास्त २७५ प्रतिकॅरेट, तर कमीत कमी ३५ रुपये प्रतिकॅरेट भाव मिळाला.