नाशिक (सुयोग जोशी) : सिटिलिंक बससेवा वाहकांच्या उठसुठ संपाला कंटाळलेल्या महपालिकेने नवा वाहक ठेकेदार नेमला आहे. त्याकडे नाशिकरोड डेपोची जबाबदारी देण्यात आली असून पन्नास वाहक बससेवेत रुजू झाले आहेत. जुना ठेका चार महिन्यांनी संपुष्टात येत असून त्यानंतर नाशिकरोड डेपोला वाहक पुरविण्याची सर्व जबाबदारी या नव्या ठेकेदाराला दिली जाणार आहे.
नागपूरस्थित युनिक या कंपनीला सिटीलिंकच्या नाशिककरोड विभागासाठी वाहक पुरवण्याचे काम दिले असून या कंपनीने ५० वाहक पुरवलेही आहेत. आधीच्या ठेकेदाराची मुदत चार महिन्यांनी संपणार असून, त्यानंतर हा ठेकेदार १८० वाहक पुरवणार आहे. महापालिकेने जुलै २०२१ मध्ये महानगर परिवहन महामंडळाच्या अंतर्गत सिटीलिंक शहर बससेवा सुरू केली. सिटीलिंक बससेवा पंचवटी आणि नाशिकरोड अशा दोन डेपोतून नाशिककरांना सेवा देते. या सेवेसाठी वाहक पुरवण्यासाठी या दोन्ही विभागांना स्वतंत्र एक याप्रमाणे दोन ठेकेदार नेमण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार एका ठेकेदाराला अधिकाधिक ४०० वाहक पुरवण्याची मर्यादा ठरवूनही दिली होती. सुरवातीला वाहकांची संख्या कमी असल्याने एकाच ठेकेदाराकडून दोन्ही डेपोंसाठी वाहक घेतले जात होते.
दरम्यान शहर बस सेवेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने सिटीलिंकने त्याच ठेकेदाराकडून ५५० वाहकांची सेवा घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, मागील दोन वर्षांत या वाहकांनी जवळपास सातवेळा आंदोलन केले व अचानकपणे झालेल्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊन सिटीलिंक बससेवेची प्रतिमा मलीन झाली. यामुळे दोन्ही डेपोंसाठी दोन स्वतंत्र पुरवठादारांची नेमणूक करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. यामुळे वाहकांनी संप पुकारल्यास किमान पन्नास टक्के बससेवा सुरू राहील, हा यामागील हेतु आहे. त्यानुसा सिटीलिंक कपंनीने डिसेंबर २०२२ मध्ये निर्णय घेत टेंडर प्रक्रिया राबवली. महापालिकेच्या नेहमीच्या खाक्यानुसार ही प्रक्रिया वर्षभर चालली. त्यात नागपूर येथील युनिक कंपनी त्यास पात्रही ठरली. मात्र, या कंपनीकडून एक कोटी रुपये अनामत रक्कम भरण्यास टाळाटाळ केली जात असल्याने कार्यारंभ आदेश लांबले. अखेरीस या कंपनीने जानेवारीमध्ये अनामत रक्कम भरल्यानंतर त्यांना कार्यारंभ आदेश दिले आहेत.