नाशिक : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या सात नगर पालिकांचा प्रभाग रचोचा कार्यक्रम जाहीर झाला असून, या पालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. मनमाड, सिन्नर, येवला, नांदगाव सटाणा, चांदवड आणि भगूर या त्या नगर पालिका असून तेथील राजकीय हालचाली आता गतिमान होणार आहेत. या नगर पालिकांची मुदत गतवर्षी २९ डिसेंबर रोजी मुदत संपली असून सध्या प्रशासकांची राजवट सुरू आहे.
ज्या नगर पालिकांच्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये ब वर्गामधील मनमाड, सिन्नर आणि येवला तर क वर्गाच्या नांदगाव, सटाणा, चांदवड आणि भगूर नगर पालिका आहेत. या नगरपालिकांच्या प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव, प्रभागाची संख्या, प्रभागनिहाय एकूण व अनुसूचित जमातींची लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन व नकाशा बुधवार, दि. २ मार्च २०२२ पर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावयाचे आहेत. सोमवार, दि. ७ मार्चपर्यंत त्याला मान्यता दिली जाणार आहे. गुरुवार, दि. १० मार्चपर्यंत प्रभाग रचना प्रसिद्ध होणार आहे. दि. १७ मार्चपर्यंत त्यावर हरकती व सूचना पाठविता येतील. मंगळवार, दि. २२ मार्चपर्यंत हरकती व सूचनांवर सुनावणी होणार असून दि. २५ मार्चपर्यंत राज्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे अहवाल पाठवण्यात येणार आहे. शुक्रवार, दि. १ एप्रिल २०२२ पर्यंत अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देऊन मंगळवार, दि. ५ एप्रिल अंतिम अधिसूचना प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.