बोलठाण: जातेगाव येथील खारी नदी पार करीत असताना महिला शेतमजूर व दोन मुली वाहून गेल्या होत्या. त्यातील दोन मृतदेह सापडले होते, तर एका मुलीचा शोध घेण्यासाठी दोन दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या प्रयत्नांतून अखेर पूजा सोनवणे हिचा मृतदेह बोलठाण येथील नदीपात्रात सापडला. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला.
दि.२४ रोजी नांदगाव तालुक्यातील जातेगाव हद्दीतील खारी नदीच्या मार्गातून घरी जातांना शेतमजुरांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांची बैलगाडी पाण्यात उलटली. यावेळी मीनाबाई दिलीप भैरव (४५), साक्षी अनिल सोनवणे (११), पूजा दिनकर सोनवणे (१५, रा.आडगांव, ता. कन्नड) हे पाण्याच्या प्रवाहात लाहून गेले. या दुर्घटनेतील मीनाबाई दिलीप भैरव, साक्षी अनिल सोनवणे यांचे मृतदेह त्याच दिवशी सापडले. मात्र, पूजा दिनकर सोनवणेचा शोध लागला नव्हता. दोन दिवस पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथकाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अखेर दि. २६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास पोलीस प्रशासनासह आपत्ती व्यवस्थापन पथकाला पूजा सोनवणे हिचा मृतदेह सापडला.
सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. पोलीस नाईक अनिल गांगुर्डे, प्रदीप बागुल, आपत्ती व्यवस्थापन पथकासह सागर गडाख, विलास सूर्यवंशी, किसन जाधव, नीलेश नाठे, वैभव जमदाडे, किरण वाघ, संकेत वनारसे, बाळू आंबेकर, अजय चारोस्कर, कृष्णा धोंडगे, तसेच महसूल प्रशासनासह परिसरातील नागरिकांनी शोधकार्य हाती घेतले होते. तीन महिलांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.