नाशिक : शहर व परिसरासह उपनगरांमध्येही रात्री अकरा वाजता अचानकपणे जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्री दहा वाजेपासून ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू होता. हवामान खात्याकडून रात्री जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला होता. यानुसार पावसाने शहराला पुन्हा झोडपले. सुमारे अर्धा तास चाललेल्या पावसाने रस्त्यांवर पाण्याचे पाट वाहू लागले होते.
नाशिक शहरात गुरुवारी (दि.२३) मध्यम पावसासह सामान्यत: ढगाळ हवामान असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. यानंतर रात्री पुन्हा साडेनऊ वाजेच्या सुमारास हवामान खात्याकडून गडगडाट वादळी पावसाचा इशारा रात्री दहा वाजेपर्यंत दिला. ढग दाटून आल्यानंतर गडगडाट सुरू झाला आणि भगुर, नानेगाव, दोनवाडे या भागांत रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस पडला. तसेच शहराच्या मध्यवर्ती भागात अकरा वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पंचवटीसह सीबीएस, शरणपूररोड, गंगापूररोड, जुने नाशिक या मध्यवर्ती भागासह नाशिकरोड, अशोकामार्ग आदी भागांत जोरदार पाऊस झाला. सुमारे पंधरा ते वीस मिनिटे पावसाचा जोर कायम होता. यानंतर पावसाच्या हलक्या सरी उशिरापर्यंत सुरू होत्या. पावसाच्या हजेरीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. यामुळे दिवसभरापासून उकाड्याचा सामना करणाऱ्या नाशिककरांना दिलासा मिळाला. पुढील तीन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.