नाशिक : धुळे लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून मी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक हाेतो, परंतु मला नेहमीच डावलले गेले. मागील निवडणुकीतही मी धुळ्याचे तिकीट मागितले अन् मला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करून टाकले. यावेळीही मी तिकीट मागितले अन् दुसऱ्याच उमेदवाराला तिकीट दिले गेले, मी नाराजी व्यक्त करत राजीनामा देताच थोरात साहेबांनी माझे बिन टाक्याचेच ऑपरेशन करून टाकल्याची खदखद काँग्रेसचे मावळते अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी व्यक्त केली. डॉ. शेवाळे यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरातांसह पक्षातील पदाधिकाऱ्यांसमोर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. कहां राजा भोज कहां गंगू तेली अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
एम.जी रोडवरील काँग्रेस कार्यालयात शहर व जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. शेवाळे म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणुकीत मी उमेदवारी मागितली होती. परंतु त्यावेळी उमेदवारी न देता मला जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद दिले. पाच वर्ष अध्यक्षपद भुषविले. लोकसभेची देखील तयारी सुरू ठेवली. परंतु यावेळीही पक्षाकडून माझी उमेदवारी कापण्यात आली. जिल्हाध्यक्ष झालो तेव्हाच पाच वर्षांहून अधिक काळ या पदावर राहायचे नाही असे ठरविले होते. धुळ्यात उमेदवारी नाकारल्यामुळे मला राजीनामा देण्याची संधी मिळाली. ती स्वीकारून मी राजीनामा दिल्याचे शेवाळे म्हणाले. यावेळी शेवाळे म्हणाले, माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते स्व. विलासराव देशमुख यांनी मला गेल्या वीस वर्षांपूर्वीच मला धुळे लोकसभा मतदारसंघासाठी तयारी करण्यास सांगितले होते. त्यानुसार मी तयारीही सुरू केली होती, परंतु दिवसेंदिवस समीकरणे बदलत गेले त्याप्रमाणे माझ्या उमेदवारीवर गंडांतर आले. तसे पाहिले तर मला कोणताही राजकीय वारसा नाही. आम्ही नेत्यांच्या मनामध्ये नसलो तरी लोकांच्या मनात नक्कीच आहे. यापुढे फक्त काँग्रेसचे काम करणार असून कोणत्याही पदाची लालसा नाही असेही शेवाळे म्हणाले.