सिन्नर : विहिरीत कुत्रे पडल्याचा समज झाल्याने दोरखंडाच्या साहाय्याने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करायला गेलेल्या शेतकऱ्याला विहिरीत कुत्रे नसून बिबट्या असल्याचे दिसताच धक्का बसला. तथापि, शेतकऱ्याने प्रसंगावधान राखून वनविभागाला माहिती दिल्यानंतर चार तासांच्या रेस्क्यूनंतर एक वर्षाच्या बिबट्याला सिन्नर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढल्याची घटना बुधवारी (दि.२३) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.
त्याचे झाले असे, नाशिक-पुणे महामार्गाजवळ सिन्नर बायपासला गोविंद काशिनाथ भाटजिरे यांची शेतजमीन आहे. या शेतजमिनीत मजुरांची वस्ती असून जवळच विहीर आहे. बुधवारी रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास कुत्रे भुंकण्याचा व धावण्याचा आवाज आला. याच वेळी विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज मजुरांना आला. त्यांनी भाटजिरे यांना घटनेची माहिती देऊन विहिरीत कुत्रे पडल्याचे सांगितले. विहीर पाणी पिण्यासाठी वापरत असल्याने रातोरात विहिरीत पडलेले कुत्रे बाहेर काढण्याचा निर्णय भाटजिरे व मजुरांनी घेतला. दोरखंड आणून विहिरीत सोडण्यात आला. बॅटरी लावल्यानंतर ते कुत्रे नसून बिबट्या असल्याचे दिसताच सर्वांना धक्का बसला. तथापि, भाटजिरे यांनी साडेआठ वाजेच्या सुमारस सिन्नरच्या वनविभागाला बिबट्या विहिरीत पडल्याचे सांगत त्याचे प्राण वाचविण्याची विनंती केली.
सिन्नरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांनी पश्चिम उपविभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग, नाशिक विभागाचे सहायक वनसंरक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर वनविभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी रवाना केले. विहिरीला कठडे नसल्याने व उतार असल्याने विहिरीत शिडी किंवा पिंजरा सोडणे अवघड काम होते. त्यामुळे घटनास्थळी हायड्रोलिक बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्री अकरा वाजेच्या सुमारास हायड्रोलिक दाखल झाली. त्याद्वारे विहिरीत पिंजरा सोडण्यात आला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने व विहिरीत बॅटऱ्या व मोबाइल चमकविणाऱ्यांची संख्या वाढल्याने भेदरलेला बिबट्या पिंजऱ्यात जात नव्हता. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सर्वांना विहिरीपासून दूर करीत रेस्क्यू राबविले.
इन्फो
हायड्रोलिकचा वापर
पिंजऱ्यात बिबट्या गेल्यानंतर हायड्रोलिकच्या साहाय्याने पिंजरा व बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. यावेळी रात्रीचे साडेबारा वाजले होते. वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्या नेतृत्वाखाली वनपाल सुजीत बोकडे, रोहित लोणारे, किरण बोऱ्हाडे, पोपट बिन्नर, तुकाराम डावरे, बालम शेख यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी सदर मोहीम फत्ते केली. भक्ष्याचा पाठलाग करताना सदर एक वर्षाचा बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज आहे.
फोटो- २४ बिबट्या