उमेदवारी वडिलांना, अर्ज भरला मुलाने; आपल्याच जागेबद्दल काँग्रेस गाफील, भाजपाकडून पाठिंब्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 07:06 AM2023-01-13T07:06:59+5:302023-01-13T07:07:13+5:30
नाशकात सुधीर तांबे यांना होती काँग्रेसची अधिकृत उमेदवारी; ऐनवेळी मुलगा सत्यजित यांची अपक्ष एन्ट्री
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जबरदस्त ‘उमेदवारी नाट्याने’ चर्चेत आली आहे. नामांकन भरण्याच्या अखेरच्या दिवशी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी माघार घेतली आणि त्यांचे पुत्र तथा महाराष्ट्र युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. भाजपने अधिकृत उमेदवार न देता सत्यजित यांना पाठिंबा जाहीर करण्याची भूमिका घेतल्याने नव्या समीकरणाला उधाण आले आहे.
भाजपने दोन कार्यकर्त्यांना अर्ज भरण्यासाठी प्रोत्साहित केले. प्रत्यक्षात दोघांनाही एबी फॉर्म दिला नाही. परिणामी, पहिल्यांदाच पदवीधर निवडणुकीत राजकीय पक्षाचा एकही अधिकृत उमेदवार नसून, अपक्षांमध्येच लढत होणार आहे. अखेरच्या दिवसापर्यंत २९ उमेदवारांनी ४४ अर्ज दाखल केले आहेत. अर्जांची शुक्रवारी छाननी करण्यात येणार आहे.
असे घडले नाट्य...
सुधीर तांबे हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असल्याचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी सकाळीच जाहीर केले. भाजपने उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात ठेवले होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी दुपारी बारानंतर घोषणा करू, असे सांगितल्याने उत्सुकता ताणली गेली. भाजपने धनंजय जाधव व धनराज विसपुते या दोघांना अर्जाची तयारी करण्यास सांगितले.
दुपारी दीडला सत्यजित तांबे हे पत्नीसह आले व अर्ज भरण्याची तयारी सुरू केली. भाजपकडून सत्यजित यांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा पसरल्याने भाजप उमेदवारांचीही अस्वस्थता वाढली. पावणेतीनच्या सुमारास सत्यजित यांनी काँग्रेस व अपक्ष असे दोन अर्ज भरले, तर भाजपच्या वतीने जाधव व विसपुते या दोघांनी भाजप व अपक्ष असे अर्ज दाखल केले. मात्र, तिघांनीही एबी फॉर्म जोडला नसल्याचे निवडणूक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
इतरत्र चित्र काय?
अमरावती पदवीधर मतदारसंघ
३४ उमेदवारांकडून ४४ नामांकन अर्ज दाखल. ऐनवेळी काँग्रेसच्या वाट्याची जागा शिवसेनेला देण्यात आली. धीरज लिंगाडे हे मविआचे उमेदवार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी सांगितले.
नागपूर शिक्षक मतदारसंघ
भाजप समर्थित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांनी गुरुवारी अर्ज दाखल केला. भाजपने ऐनवेळी गाणार यांना समर्थन दिले. काँग्रेसने अजून कुणालाही पाठिंबा न दिल्याने लढतीचे चित्र अस्पष्ट आहे.
कोकण शिक्षक मतदारसंघ
शेकापचे बाळाराम पाटील यांनाच पुन्हा संधी. मविआचा त्यांना पाठिंबा आहे. त्यांची लढत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याशी असेल. १३ उमेदवारांनी १९ अर्ज भरले आहेत.
मराठवाडा शिक्षक मतदारसंघ
राष्ट्रवादीने पुन्हा विक्रम काळे यांनाच उमेदवारी दिली, तर भाजपने किरण पाटील यांना रिंगणात उतरवले. दोघांनीही अर्ज भरला. एकूण १५ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.