कळवण : तालुक्यात महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे शेतकऱ्यांना कमी वेळ वीजपुरवठा होत असल्याने शेतकरी बांधवांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.४) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या आदेशान्वये राज्य कार्यकारिणी सदस्य गोविंद पगार यांच्या नेतृत्वाखाली, तसेच तालुकाध्यक्ष रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन महावितरणचे कार्यकारी अभियंता रामराव राठोड यांना देण्यात आले.
कळवण तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील गावांमध्ये शेतीसाठी लागणारा वीजपुरवठा आठ तासांऐवजी फक्त चारच तास मिळत असून तोसुद्धा पूर्ण वेळ राहत नाही. या चार तासांत अनेक वेळा वीजपुरवठा बंद होत असतो. त्यामुळे शेतीला मुबलक प्रमाणात पाणी मिळत नसल्याने शेतकरी बांधवांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेत पिकाला लागवडीपासून ते खते, औषधे, मजूर यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात; परंतु विजेअभावी पिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने पिकांचे नुकसान होत असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे. त्यामुळे कळवण तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करून निवेदन देण्यात आले.
आंदोलनात युवा तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव, भाईदास पाटील, काशीनाथ गुंजाळ, शरद गुंजाळ, रावसाहेब गुंजाळ, ज्ञानेश्वर गुंजाळ, विलास बस्ते, भारत पवार आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.
इन्फो
या आहेत मागण्या!
निवेदनात शेतकऱ्यांना किमान दिवसातून दहा तास वीजपुरवठा मिळावा, सिंगल फेजमध्ये ट्रिप होणारी लाइन बंद करावी, सक्तीची वीज वसुली थांबवावी, त्याचप्रमाणे अगोदर शासनाकडून वीज वसुली करून नंतर शेतकऱ्यांकडून वसुली करावी, तसेच पाळे, हिंगळवाडीसह संपूर्ण ग्रामीण भागात वीजपुरवठा पूर्ववत करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.