नाशिक : जनावरांना चारा आणण्यासाठी रानात गेलेली महिला चारा घेऊन घराकडे परतत असताना गुरूवारी (दि.९) वाटेतच त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यामुळे भाजलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. सविता बाळासाहेब गोडसे (३९,रा.संसरी) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. मान्सुनपुर्व वादळी पावसाने महिलेच्या रुपाने हा पहिला बळी घेतला. हवामान खात्याकडून नाशिकमधील काही भागात गुरुवारी जोरदार वादळी पावसाचा इशारा देण्यात आला होता.
लहवित, नानेगाव, संसरी, देवळाली कॅम्प भागासह नाशिक तालुक्याच्या पुर्व भागाला जोरदार पावसाने झोडपले. वीजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह झालेल्या वादळी पावसाचा चांगलाच तडाखा बसला. दरम्यान, सविता गोडसे या संसरी येथील रानात जनावरांना चारा आणण्यासाठी दुपारच्या सुमारास गेल्या होत्या. चारा घेऊन घराकडे त्या परतत असताना वाटेतच जोरदार वीज कडाडून कोसळली. यामुळे गोडसे या भाजल्या. सुदैवाने त्यांच्यासोबत असलेली मुलगी ही गोडसे यांच्यापासून काही अंतर पाठीमागे चालत असल्याने ती बचावली; मात्र डोळ्यांदेखत तिला आपल्या आईचा मृत्यू बघावा लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आजुबाजुला असलेल्या गावकऱ्यांनी जखमी अवस्थेत गोडसे यांना रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.
दरम्यान, हवामान खात्याकडून नाशिकमधील काही भागात गुरुवारी जोरदार वादळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. यानुसार शहरासह तालुक्याच्या काही गावांना पावसाने झोडपून काढले. देवळाली कॅम्प, पळसे, नाशिकरोड, जेलरोड, उपनगर या भागात पावसाचा जोर जास्त होता.