नाशिक : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेशाचा मार्ग खुला व्हावा आणि शारिरिक मानसिक क्षमता विकसित व्हावी, यासाठी राज्यभरातील मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण जिल्हा प्रशासनाकडून दिले जाणार आहे. याासाठी पहिल्या टप्प्यात १५२विद्यार्थिनींमधून मुलाखतीतून तीस मुलींची निवड करण्यात येणार आहे. येत्या १५जुनपर्यंत या प्रशिक्षण वर्गाची पहिली बॅच सुरू होईल, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात मुलींसाठी सैनिकी सेवापुर्व प्रशिक्षण संस्था सुरू करण्याबाबत भुसे यांनी सोमवारी (दि.८) अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या कार्यवाहीचा त्यांनी एकुण आढावा घेतला. नाशिक शहरातील त्र्यंबकरोडवरील माजी सैनिकांच्या पाल्यांचे वसतीगृह असलेल्या इमारतीला जिल्हा नियोजन समितीमार्फत सुमारे १५ लाखांचा निधी पुरविण्यात आला. यामाध्यमातून ही इमारत अद्ययावत करण्यात आली आहे. राज्यातील पहिली एकमेव मुलींसाठी सैनिकी सेवापुर्व प्रशिक्षण संस्था याठिकाणी सुरू करण्यात येत आहे.
सुमारे १०० विद्यार्थिनींची क्षमता असलेल्या सुसज्ज अशा या इमारतीत सैनिकी सेवापुर्व प्रशिक्षण संस्था कार्यान्वित केली होणार असल्याचे भुसे म्हणाले. मैदानी चाचण्या, शारिरिक व्यायाम व सैनिकी सेवा पुर्व प्रशिक्षणाचे धडे निवड झालेल्या तीस मुलींना महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीमध्ये दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातून सुमारे राज्यभरातून ३,९००विद्यार्थिनींनी सैनिकी सेवा प्रशिक्षण पुर्व परिक्षेसाठी अर्ज केले होते. त्यापैकी ३,३०० विद्यार्थिनींनी परिक्षा दिली. त्यापैकी १५२विद्यार्थिनींनी विशेष गुणवत्ता यादीत स्थान पक्के केले आहे. यापैकी प्रत्येकी तीस मुलींना टप्प्याटप्यांत प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती भुसे यांनी यावेळी दिली.
सीबीएसई बोर्डातून देणार बारावीची परिक्षासर्वोच्च न्यायालयाने २०२१साली लष्करी अधिकारी पदावर मुलींना संधी देण्यात यावी, असा निकाल दिल्यानंतर त्यांचे लष्करी अधिकारी होण्याचे स्वप्न पुर्ण होणार आहे. दहावीची परिक्षा उत्तीर्ण केल्यानंतर मुलींना सैनिकी सेवापुर्व प्रशिक्षणासाठी अर्ज करता येतो. यानंतर दोन वर्षांचे सैनिकी सेवा पुर्व प्रशिक्षण घेऊन सीबीएसई बोर्डातून बारावीची परिक्षा उत्तीर्ण करत ‘एनडीए’मध्ये प्रवेश मिळविता येणार आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ओंकार कापले यांनी दिली.
छ.संभाजीनगरमध्ये मुलाखती
गुणवत्ता यादीतील १५२ मुलींच्या मुलाखतींना मंळवारपासून (दि.९) छत्रपती संभाजीनगरमधील प्रशिक्षण संस्थेत प्रारंभ होणार आहे. मुलाखतीत यशस्वी झालेल्या तीस विद्यार्थीनींची निवड निवासी प्रशिक्षण सत्रासाठी पहिल्या टप्प्यात केली जाणार आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी दोन वर्षांचा राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.