नाशिक : चमचमीत मिसळ-पावभाजी, खमंग वडा आणि ठसका लावणारे नाॅनव्हेजसारखे पदार्थ, स्ट्रीट फुडवरील फुड हबची चवच न्यारी. त्यामुळेच नाशिकमध्ये केवळ हॉटेल्समध्येच नाही तर नाशिकमधील मिसळ असो वा अन्य खाद्य पदार्थ अगदी भेळसाठी सुद्धा नाशिककर रस्त्यावर उभे राहून आस्वाद घेतात. मात्र, या स्ट्रीट फुडला हबमध्ये परावर्तित करण्यात येणार असून तसा प्रस्ताव केंद्र शासनाने तयार केला आहे.
राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाने देखील त्यानुसार नाशिक महापालिकेला प्रस्ताव दिला असून तीन ठिकाणी अशाप्रकारचे हब साकारण्याचा प्रस्ताव आहे. विशेष म्हणजे या हबसाठी केंद्र आणि राज्य शासन मिळून नाशिक महापालिकेला तब्बल १ कोटी रुपये देणार आहे. कोणतेही शहर असो त्यात चांगल्या हॉटेल्सबरोबर खाऊ गल्ल्याही असतातच. याशिवाय तेथील स्थानिक खाद्य पदार्थांची चव असलेल्या हातगाड्याही परिचित असतात. नाशिकमध्ये अशा अनेक ठिकाणी स्ट्रीट फुड फोफावले आहेत.
मिसळपासून ते नॉन व्हेजपर्यंत सर्वच पदार्थ स्ट्रीट फुडमध्ये मिळतात. लेखा नगर चौपाटी असो अथवा शरणपूर पालिका बाजाराजवळील मार्केट असो, नेहरू गार्डनभोवतीच्या हातगाड्या किंवा उपनगरातील स्ट्रीट फुड ही लोकप्रियच आहे. मात्र, अशाप्रकारचे खाद्य पदार्थ स्वच्छता आणि टापटीप असेल तर अधिक उपयुक्त ठरू शकतात हेच लक्षात घेऊन केंद्र शासनाने नाशिकसह राज्यातील तीनशहरांची निवड केली आहे. या एका हबसाठी केंद्र शासन नाशिक महापालिकेला एक कोटी रुपयांचा निधी देणार असून त्यातून स्वच्छता आणि अन्य मूलभूत सुविधांचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे.
हबमध्ये बसण्यासाठी चांगली व्यवस्था, पिण्याचे पाणी, कचरा टाकण्याची व्यवस्था, वाहनतळ अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. फुड हबचे व्यवस्थापन अनुभवी याच क्षेत्रातील संस्थेला देण्यात येणार असून त्यामुळे ते अधिक सुलभ ठरणार आहे. तूर्तास नाशिकशहरातील गोदाघाट, गंगापूर, तपोवन या भागात स्ट्रीट फुड हबसाठी प्रस्ताव असल्याचे सांगितले जाते. मात्र जागा निश्चित करण्यासाठी आयुक्तच नसल्याने हा प्रस्ताव रखडला आहे.